घरमुंबईराजकीय सल्लागार एक दुधारी तलवार

राजकीय सल्लागार एक दुधारी तलवार

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यापासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार हे काँग्रेसमधील पद रिक्त आहे. अहमद पटेल यांचे गांधी कुटुंबियांसोबत असलेले जिव्हाळ्याच्या संबंध, पक्षबद्दलची जाण आणि इतर राजकीय पक्षांशी असलेल्या मित्रत्वाच्या संबंधांमुळे पटेल यांना ते पद मिळाले होते. पटेल यांनीही त्या पदाला न्याय दिला. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन करून पटेल यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत कसा राहील हे पाहिले. वाजपेयींचे सरकार गेल्यानंतर सलग दोन टर्म काँग्रेस केंद्रात सत्तेत होती. त्याचे श्रेय अहमद पटेल यांना जाते. अशा अहमद पटेल यांचे रिक्त झालेले काँग्रेसमधील पद, नव्याने उदयास आलेले राजकीय, निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांना हवंय. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण प्रशांत किशोर खरंच त्या पदाला न्याय देऊ शकतील का? २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत आजवरच्या तमाम राजकीय अभ्यासकांना व विश्लेषकांना धक्का देत प्रशांत किशोर नावाचा नवा चाणक्य भारतीय राजकारणात अवतरला होता.

मोदींनी भाजपाला बहुमत मिळवून देईपर्यंत प्रशांत किशोर यांचे नाव कुणाच्या खिजगणतीतही नव्हते. पण मोदींच्या एका हातात भारतीय जनता पक्ष व संघाची संघटना होती. तर दुसर्‍या बाजूला प्रशांत किशोर यांचे नवे आधुनिक कल्पक प्रचारतंत्र होते. त्यात मोदींचा दबदबा वाढू लागल्यावर काँग्रेस गडबडून गेली होती. अशाच एका प्रसंगी काँग्रेसचे बुद्धिमान नेते मणिशंकर अय्यर यांनी ‘वोह चायवाला’ अशा हेटाळणीयुक्त शब्दात मोदींची टिंगल केली होती. तेच सूत्र पकडून प्रशांतने मोदींच्या देशव्यापी ‘चाय पे चर्चा’ योजल्या होत्या. त्यातून लोकसभा निवडणुकीचे चित्र पालटून टाकले होते. मग दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी केजरीवाल यांना हात दिला होता. तिथेही भाजपाच्या संघटनेला व प्रचाराला दणका देऊन प्रशांतनी आम आदमी पक्षाला दणदणीत बहुमत मिळवून दिले होते.

- Advertisement -

‘पाच साल केजरीवाल’ ही त्यांचीच घोषणा होती असे म्हणतात. पण नंतर त्यांनी बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार व लालूंना साथ देण्याचा पवित्रा घेतला आणि ती त्यांची खरी कसोटी होती. कारण तेव्हाही मोदीलाट होती आणि त्यावरच स्वार होण्याचा अमित शहा व भाजपा यांचा मनसुबा प्रशांत यांनी उधळून लावला होता. त्यांच्या तालावर लालू व नितीश नाचले आणि भारतीय राजकारणाला नव्या चाणक्याची ओळख झाली होती. कारण बदनाम लालू व निराश नितीश यांना एकत्र आणून प्रशांतनी भाजपाला शह देऊन दाखवला होता. त्यामुळेच प्रथम पंजाबचे काँग्रेसनेते अमरिंदर सिंग यांनी प्रशांतना हातशी धरले आणि तिथून त्यांचे व राहुलचे साटेलोटे जमले.

पंजाब बाजूला पडला आणि उत्तर प्रदेशात नव्याने काँग्रेसला संजीवनी देण्याचे कंत्राट प्रशांतनी घेतले. तीनशे कोटी रुपये देऊन काँग्रेसने त्यांच्यावर जबाबदारी सोपवल्याची माहिती आहे. दोनतीन महिने खपून प्रशांतनी उत्तर प्रदेशातील काँग्रेस संघटना व एकूण राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र त्यांच्याशी स्थानिक वा ज्येष्ठ काँग्रेस नेते सहकार्य करीत नसल्याच्या बातम्या येत राहिल्या. प्रथम त्यांनी या राज्यात काँग्रेसने ब्राह्मण चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी राहुल वा प्रियंका गांधींचे नाव जाहीर करण्याचा आग्रह धरला होता. पण नेहरू खानदानात पंतप्रधानच जन्माला येतात, अशी ठाम श्रद्धा असलेल्या काँग्रेसी नेतृत्वाने त्यांचा सल्ला फेटाळून लावला आणि तिथूनच त्याच्या चाणक्यगिरीला शह मिळू लागला.

- Advertisement -

अखेर तडजोड म्हणून दिल्लीतून निवृत्त झालेल्या शीला दीक्षितांना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले. तर उत्तर प्रदेशात राहुल गांधींची दीर्घकालीन किसानयात्रा काढायची कल्पना राबवली गेली. चार पाच हजार मैल प्रवास करणारी ही यात्रा, मोठ्या गावात खाटचर्चा करणार होती. पण पहिल्याच अशा खाटचर्चेच्या शेवटी जमलेल्या गर्दीने खाटाच पळवून नेल्या आणि पुढल्या प्रत्येक खाटसभेत त्याचीच पुनरावृत्ती होत गेली. सहाजिकच किसानयात्रेला मिळणार्‍या प्रतिसादापेक्षाही खाट पळवणारा जमाव, हाच बातमीचा विषय होऊन गेला. मग त्या यात्रेचा पुरता बोजवारा उडाला. तरीही अनेक तडजोडी करीत प्रशांतने कल्पकता राबवली. पण ज्येष्ठ जुन्या काँग्रेस नेत्यांना हा नवा चाणक्य पचवता आला नाही आणि आता तर त्यालाच हाकलून देण्याचा विचार पक्षात बळावल्याची चर्चा आहे.

किसानयात्रेचा बोजवारा उडाला आणि समाजवादी पक्षात भाऊबंदकी निर्माण झाल्याने, उत्तर प्रदेशी राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. त्यामुळे भाजपाला हरवणे तर कठीण झाले आहेच. पण स्वबळावर काँग्रेस उभी करणे असंभव होऊन गेले आहे. अशा स्थितीत मुलायम बिहार पद्धतीने महागठबंधन करण्याच्या विचारात असल्याचे कळताच प्रशांत किशोरनी त्यांची थेट भेट घेतल्याची बातमी आली. अशा महाआघाडीत काँग्रेसही सहभागी होणार असल्याच्या बातम्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते विचलीत झाले. आपल्याला कल्पनाही न देता प्रशांत परस्पर मुलायमना भेटायला गेल्याने काँग्रेसच्या गोटात संताप निर्माण झाला आणि त्यातूनच आता प्रशांतला डच्चू मिळाला. अर्थात त्यामुळे प्रशांतचे कुठले आर्थिक नुकसान होणार नाही. पण त्यांनी मोदींना देदीप्यमान यश मिळवून देत आणि त्यानंतर बिहारमध्ये भाजपला दणका देऊन संपादन केलेली प्रतिष्ठा मात्र धुळीस मिळणार आहे. कारण उत्तर प्रदेशात काँग्रेसला सत्ता नाही तरी चांगले यश त्याने मिळवून द्यावे, अशी किमान अपेक्षा होती. पण त्याची सर्व कल्पकता किंवा रणनीतीचा राहुलनी पुरता बोर्‍या वाजवला आहे. मात्र त्याचे खापर प्रशांत किशोर यांच्यावर फोडले आहे.

खरेतर त्याने ही जबाबदारी घेण्यापूर्वी देशातील त्या मोठ्या राज्यात काँग्रेसची असलेली दुर्दशा विचारात घ्यायला हवी होती. मोदींना यश मिळवून देताना संघाची शक्ती पाठीशी होती आणि बिहारमध्ये रणनीती आखताना नितीश-लालूंच्या मागे संघटनेचे किमान पाठबळ उभे होते. काँग्रेसपाशी कुठलेच संघटन नाही की कार्यकर्ते नसतील, तर रणनीती काय उपयोगाची? तिथेच प्रशांत किशोर फसले आणि त्याच्या अब्रुचे धिंडवडे निघाले. आता तेच प्रशांत किशोर सोनिया गांधींचे सल्लागार म्हणून पद मिळवू इच्छित असतील तर त्यांना प्रथम सोनिया गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी सामना करावा लागणार आहे.

प्रशांत किशोर भले चांगला सल्ला देतील, पण तो मनावर घेऊन राहुल गांधी यांनी त्याची योग्य अंमलबजावणी करायला हवी. ती होणार नसेल तर त्याचे खापर प्रशांत किशोर यांच्यावर फुटणार हे निश्चित. जे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर झाले होते. त्यामुळे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार हे पद प्रशांत किशोर यांच्या किती पचनी पडेल, याबद्दल निश्चितच शंका आहे. एक मात्र खरे ही सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार झाल्यानंतर अहमद पटेल यांनी जे ऐश्वर्य, सत्ता भोगली त्या लालसेने किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांना आपला सल्ला देण्याच्या वृत्तीला मुरड घालावी लागणार आहे. त्यापेक्षा राहुल गांधी यांना काय आवडते त्याप्रमाणे आपल्या सल्ल्याचे रुपांतर करावे लागणार आहे. ते खरंच प्रशांत किशोर यांना मानवणार आहे काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -