घरमुंबईभिवंडीत ग्रामपंचायतीला टाळे ठोकणाऱ्या १२ ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल

भिवंडीत ग्रामपंचायतीला टाळे ठोकणाऱ्या १२ ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल

Subscribe

भिवंडी तालुक्यातील खांडपे-चिंचवली या ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विकास कामांमध्ये दुर्लक्षितपणा होत असल्याचा आरोप करून आयोजित ग्रामसभेनंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकल्याची घटना घडली. मात्र या घटनेनंतर ग्रामसेविका श्वेता कृष्णा पाटील यांनी तालुका पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली असता पोलिसांनी या घटनेची खातरजमा करून १२ नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यासह तिघा जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या तिघांनाही मंगळवारी भिवंडी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या घटनेने ग्रामपंचायत वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत सदस्य गिरीष अशोक पाटील (वय २८), हेमंत सुदाम पाडेकर (३१), शरद सुदाम फोडसे (२८) सर्व रा. चिंचवली, असे अटक केलेल्या ग्रामस्थांची नावे असून प्रशांत भोईर, योगेश भोईर, पद्मन पाटील, विनोद डाके, सागर पाडेकर, अशोक भोईर, अमोल पाडेकर, अजय पाटील, विशाल पाटील आदींवर भादंवि. कलम ३५३, ३४१, १४३, १४७, १४९ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. मात्र ते फरार झाले आहेत. १५ ऑगष्ट रोजी होणारी तहकूब ग्रामसभा सरपंच सविता भांबरे यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच गुलाबबाई सुदाम तारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात २३ सप्टेंबर रोजी आयोजित केली होती. या ग्रामसभेसाठी दोन्ही गावचे एकूण ८५ ग्रामस्थ हजर होते. त्यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेविका श्वेता पाटील यांच्यावर ग्रामसभेत भ्रष्टाचाराचा आरोप करून चिंचवली, खांडपे या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासनाने कागदोपत्री सर्व योजना राबविल्याचे दाखवले आहे.

- Advertisement -

मात्र ग्रामपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, पाणी शुद्धीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या औषध खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. त्यावर ग्रामसेविका श्वेता पाटील व कर्मचारी निरुत्तर झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर काढून ग्रामपंचायतीला टाळे ठोकून कार्यालय बंद केले. त्यानंतर याबाबत जोपर्यंत गटविकास अधिकारी समाधानकारक कारवाई करत नाहीत, तोपर्यंत लावलेले कुलूप उघडले जाणार नाही, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. या सर्व घटनेचे काही तरुणांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते प्रसारित केले. हा व्हिडिओ शूटिंग ग्रामसेविका श्वेता पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात उपलब्ध केले असता पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करून ग्रामपंचायत सदस्य गिरीष अशोक पाटील, हेमंत सुदाम पाडेकर, शरद सुदाम फोडसे या तिघांना तात्काळ अटक केली आहे. तर फरार झालेल्या अन्य ग्रामस्थांचा कसून शोध सुरु असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले.

हेही वाचा –

मी स्वतः शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार घेणार – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -