Goregaon – Mulund Link Road : गोरेगाव – मुलुंड लिंक रोड उड्डाणपुलाचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

मुंबईची वाढती लोकसंख्या, वाहन संख्या पाहता रिक्षा, टॅक्सी, बसगाड्या यांच्या रहदारीसाठी सध्याचे रस्ते, पूल यांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे राज्य शासन, मुंबई महापालिका मुंबईतील रस्ते वाहतूक सुरळीत होण्यासाठी विविध विकासकामे हाती घेत आहे.

Bhumipujan of Goregaon - Mulund Link Road flyover by Aditya Thackeray
Goregaon - Mulund Link Road : गोरेगाव - मुलुंड लिंक रोड उड्डाणपुलाचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

गोरेगाव – मुलुंड लिंक रोड उड्डाणपुलाचे राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.  मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि स्वप्ननगरी मुंबईची प्रगतीच्या दिशेने जलदगतीने वाटचाल करण्यासाठी कोस्टल रोड, न्हावा शेवा, वरळी – शिवडी प्रकल्प, पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणे, गोरेगाव – मुलुंड लिंक रोड आदींसारख्या विकासकामांना गती देणे आवश्यक आहे, असे आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

तब्बल ८ हजार १३७ कोटी रुपये खर्चाच्या गोरेगाव – मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या अंतर्गत दोन पैकी भांडुप परिसरातील एका उड्डाण पुलाचे भूमिपूजन भांडुप (पश्चिम) परिसरातील डॉ. हेडगेवार जंक्शनजवळील ‘श्रीमती गोदावरी धोंडीराम पाटील मैदान’ येथे पार पडले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी, शिवसेनेचे स्थानिक आमदार रमेश कोरगावकर, सुनील राऊत, शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, माजी खासदार संजय पाटील, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त देविदास क्षिरसागर, राजेंद्रकुमार तळकर, भांडुप एस वार्डचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबि आणि कामगार नेते बाबा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईची वाढती लोकसंख्या, वाहन संख्या पाहता रिक्षा, टॅक्सी, बसगाड्या यांच्या रहदारीसाठी सध्याचे रस्ते, पूल यांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे राज्य शासन, मुंबई महापालिका मुंबईतील रस्ते वाहतूक सुरळीत होण्यासाठी विविध विकासकामे हाती घेत आहे. कोस्टल रोडचे काम ५०% पूर्ण झाले आहे. न्हावा – शेवा प्रकल्पाचे काम ६४% झाले असून ते प्रगतीपथावर आहे. वरळी – शिवडी प्रकल्पही मार्गी लावला जात आहे.

तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून नियोजित असलेल्या व पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचे कामही हाती घेण्यात आले असून काही ठिकाणी बऱ्यापैकी कामे झाली आहेत. चार टप्प्यात ही कामे होणार असून त्यापैकी नॅशनल पार्कच्या १०० मिटर खालून टनेलचे काम वन्य जीवांना व झाडांना कोणताही धक्का न लावता होणार आहे. तसेच, पश्चिम उपनगरात एक आणि पूर्व उपनगरात एक अशा दोन उड्डाणपलपुलांचे काम हाती घेण्यात येत आहे. येत्या ३-४ वर्षात दोन्ही उड्डाणपूल व देशातील मोठ्या व्यासाचे व लांबीचे टनेलचे काम मार्गी लागणार आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत दोन वर्षांपासून कोविडचा प्रादुर्भाव असतानाही शासन व मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार विकासकामे मार्गी लावण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवले असून दर महिन्याला विकासकामांचा आढावा घेण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

चार वर्षात टनेल व उड्डाणपुलाचे काम होणार – वेलरासू

गोरेगाव – मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या अंतर्गत दोन उड्डाणपूल व एका टनेलचे काम चार वर्षात पूर्ण करून वाहतुकीला खुला करण्यात येणार आहे. येत्या २-३ महिन्यात टनेल व उड्डाणपुलाचे काम चांगले मार्गी लागणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी यावेळी सांगितले.

गोरेगाव – मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • प्रकल्पाची एकूण किंमत ८ हजार १३७ कोटी रुपये ; चार टप्प्यात काम होणार
  • या प्रकल्पाअंतर्गत दोन उड्डाणपुलांचा खर्च ६६६ कोटी ६ लाख रुपये व ३ वर्षे काम
  • गोरेगाव – मुलुंड लिंक रोडची एकूण लांबी १२.२० किमी
  • नॅशनल पार्कहद्दीत वन्य जीव आणि झाडांना बाधा न पोहचवता जमिनीच्या १०० मिटर खालून ४ वर्षांत टनेल बांधणार
  • गोरेगाव – मुलुंड लिंक रोड ५ × ५ पदरी आहे.
  • गोरेगाव येथील रत्नागिरी चौक व भांडुप, डॉ. हेडगेवार चौक अशा दोन ठिकाणी सहापदरी उड्डाणपूल
  • एक तासाचा प्रवास २० मिनिटात होणार
  • या लिंक रोडला बाधक १०१अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.

सदर जोडरस्त्याची लांबी १२.२ कि.मी. असून पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व ) येथील ओबेरोय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंड (पूर्व) येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा जोडरस्ता असणार आहे.


हेही वाचा – लॉजिस्टीक पार्क, नमामी गोदा, पर्यटक केंद्राचे उद्या भूमिपूजन