लॉजिस्टीक पार्क, नमामी गोदा, पर्यटक केंद्राचे उद्या भूमिपूजन

शहराच्या विकासात भर घालणारे या तीन महत्वकांक्षी प्रकल्प

नाशिक : शहराच्या विकासात भर घालणारे नमामी गोदा, लॉजिस्टीक पार्क आणि पर्यटक मार्गदर्शन मदत केंद्र या तीन महत्वकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ येत्या रविवारी (दि. १३) केंद्रिय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपचे नाशिक प्रभारी आ. गिरीश महाजन, सहप्रभारी आ. जयकुमार रावल उपस्थित राहणार आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हे प्रकल्प साकारणार आहेत.रविवारी दुपारी १२.३० वाजता आडगाव येथे लॉजिस्टीक पार्कचे, सायंकाळी ६ वाजता नमामी गोदा प्रकल्प व पर्यटक मार्गदर्शन केंद्र उभारण्याच्या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे.

१९ किलोमीटरवर नमामी गोदा

गोदावरी नदीचा विकासासाठी नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा प्रकल्प राबविला जाणार आहे. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काही महिन्यांपूर्वी केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गोदावरी प्रदूषणमुक्ती आणि काठच्या सुशोभीकरणचा १८४२ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. याबाबत शेखावत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार महापालिकाच्या महासभेन ठरावही मंजूर केला. नाशिक शहरातून जाणार्‍या १९ किलोमीटर लांबीच्या गोदावरी नदीच्या काठांचा विकास आणि सुशोभीकरण या माध्यमातून होणार आहे.

गोदावरीसह, नासर्डी, वालदेवी, वाघाडी या उपनद्यांची प्रदूषण्याच्या विळख्यातून मुक्तता करणे, अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीसह शहरांच्या विविध भागातील गटाराचे गोदा पत्रात मिसळणारे रसायन मिश्रित पाणी रोखणे, मलनिस्सारण केंद्राची उभारणी करणे, गोदावरी नदी पत्रातील गाळ काढून पाणी साठवण, वहन क्षमता वाढविणे अशी असंख्य काम नमामी गोदा या प्रकल्पा अंतर्गत पूर्ण होणार आहे.

नाशिकरोड, पंचवटीत पर्यटन केंद्र

नाशिक शहरात भारतातील इतर राज्यातून व परदेशातून देखील पर्यटनासाठी पर्यटक येत असतात. येणार्‍या पर्यटकांना शहराची एैतिहासिक, पौराणिक व अध्यात्मिक ओळख व्हावी तसेच पर्यटकांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशन जवळ आणि गोदाघाटावरील रामकुंड येथे पर्यटकांसाठी मदत केंद्र उभारण्यात येणार आहे.

आडगावला लॉजिस्टिक पार्क

आडगांव शिवारामधील महापालिकेच्या मालकीचे ट्रक टर्मिनलच्या ५८ एकर जागेमध्ये लॉजिस्टिक पार्कचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. कच्च्या, पक्क्या मालाची वाहतूक जलदगतीने करण्याबरोबरच वाढत्या शहरांमध्ये वाहतुकीच्या प्रश्नांमुळे निर्माण होणार्‍या प्रदूषणाच्या समस्या कमी करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कची संकल्पना मांडली आहे. नाशिकमधून सुरत-चेन्नई ’ग्रीनफिल्ड मार्ग’ जात असल्याने या महामार्गाशेजारी लॉजिस्टिक पार्क उभारण्याची सूचना गडकरींनी काही महिन्यांपूर्वी केली होती. या पार्कबरोबरच ट्रक टर्मिनस, गॅरेजेस, वाहतुकीचे केंद्रही येथे विकसित केले जाणार आहे.