घरमुंबईस्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने केला शिवसेनेचा पराभव

स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने केला शिवसेनेचा पराभव

Subscribe

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असतानाही, महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणा-या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप आमने सामने आले होते. मात्र मनसे व काँग्रेसने भाजपला साथ दिल्याने शिवसेनेचा पराभव झाला आहे. सभापतीपदी भाजपचे विकास म्हात्रे हे निवडून आले ओहत. माजी मंत्री व आमदार रविंद्र चव्हाण यांनी हा करिष्मा घडविला असून, नववर्षाच्या प्रारंभीच भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शुक्रवारी स्थायी समितीच्या सभागृहात सभापतीपदाची निवडणूक पार पडली. सभापतीपदासाठी शिवसेनेकडून गणेश कोट तर भाजपकडून विकास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.

स्थायी समितीत शिवसेनेचे 8 भाजप 6 मनसे आणि काँग्रेस प्रत्येकी 1 असे पक्षीय बलाबल आहे. स्थायी समितीत शिवसेनेचे वर्चस्व असल्याने व राज्यातील महाविकास आघाडी यामुळे शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे अनुपस्थित राहिल्याने व मनसे आणि काँग्रेसने भाजपला साथ दिल्याने अवघ्या एक मताने भाजपने शिवसेनेचा पराभव केला. कोट यांना 7 मते तर विकास म्हात्रे यांना 8 मते पडली. त्यामुळे सभापतीपदी विकास म्हात्रे विजयी झाले. महापालिकेची निवडणूक अटीतटीची होणार असल्याने माजी राज्यमंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी महापालिकेत ठाण मांडून होते.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षात शिवसेना भाजपची युती झाल्यानंतर पद वाटपाबाबत निर्णय झाले होते. ठाणे महापालिकेचे उपमहापौरपद किंवा स्थायी समिती, उल्हासनगर महापालिकेत सव्वा वर्षे महापौरपद भाजपला देण्याचा निर्णय झाला होता. तसेच केडीएमसीत शेवटचे वर्षे भाजपचा महापौर असावा असा निर्णय झाला होता. गेले काही दिवस आम्ही शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्कात होतो. आपण ठरल्याप्रमाणे महापौरपद किंवा स्थायीचे सभापतीपद द्यावे असे सांगितले. महापौरांनीही राजीनामा दिलेला नाही. महायुतीत ठरलेल्या सर्व गोष्टी ठाण्यातील नेतृत्वाने टाळले. शिवसेनेकडून नेहमीच टाळाटाळ करण्यात आल्याने आम्ही सत्याच्या मार्गाने उमेदवार उभा केला. आणि अखेर सत्याचा विजय झाला आहे. काँग्रेस आणि मनसेच्या सदस्यांनी सत्याच्या बाजूने राहून मतदान केले आहे.
-रविंद्र चव्हाण, माजी राज्यमंत्री, आमदार भाजप

सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे एक सदस्य वामन म्हात्रे हे उपस्थित न राहिल्याने शिवसेनेचा पराभव झाला आहे. त्यामुळे म्हात्रे यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. राज्यात महाविकास आघाडी असली तरी काँग्रेस भाजपबरोबर गेली. त्यामुळे प्रत्येक पक्षाने ठरवायचे आपण काय करायचे. निश्चितपणे याचा परिणाम येत्या निवडणुकीत उमटतील. शिवसेनेची भूमिका पक्षीय राजकारण न करता शहर विकासाची असल्याने याचा परिणाम होणार नाही.
-गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हा प्रमुख, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -