घरमुंबईभविष्यात केमिकल ऐवजी प्‍लाझ्‍मा रॉकेटचा वापर

भविष्यात केमिकल ऐवजी प्‍लाझ्‍मा रॉकेटचा वापर

Subscribe

गगणयान मोहिमेतील व्ही. आर. ललिथअंबिका यांची माहिती

अंतराळ संशोधनात वेगाने प्रगती होत आहे. सध्या अवकाशात कोणतेही यान आणि सॅटेलाईट पाठवण्यासाठी केमिकल रॉकेटचा वापर करण्यात येत आहे. परंतु भविष्यात हे तंत्रज्ञानही कालबाह्य होऊन त्याऐवजी प्लाझ्मा रॉकेटचा वापर वाढेल. प्लाझ्मा रॉकेटचा वेग प्रचंड असल्याने याच्या माध्यमातून चंद्राहून गुरू ग्रहावर काही आठवड्यात किंवा एका महिन्यात पोहचणे शक्य होईल, अशी माहिती भारताच्या गगनयान प्रकल्पातील शास्त्रज्ञ व्ही. आर. ललिथअंबिका यांनी दिली.

आयआयटी मुंबईमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या आयआयटी टेकफेस्टमध्ये शास्त्रज्ञ व्ही. आर. ललिथअंबिका यांनी अवकाश संशोधनातील समस्या व संधी या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. अवकाशामध्ये रॉकेट वेगाने पुढे ढकलणे ही सर्वात मोठी समस्या असते. रॉकेट वेगाने जावे यासाठी सध्या केमिकल रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. केमिकल रॉकेट तंत्रज्ञानामुळे पृथ्वीची कक्षा भेदून रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत किंवा अन्य ग्रहांच्या दिशेने मार्गक्रमण करणे शक्य होते. परंतु सध्या रॉकेटला वेग देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या केमिकल रॉकेट तंत्रज्ञानाचा वेग भविष्यात फारच कमी वाटणार आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान कालबाह्य होईल व त्याची जागा प्लाझ्मा रॉकेट तंत्रज्ञान घेईल, असे ललिथअंबिका यांनी सांगितले. केमिकल रॉकेट तंत्रज्ञानामुळे सध्या चंद्राहून गुरू ग्रहावर जाण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागतो. तर प्लाझ्मा रॉकेट तंत्रज्ञानाने हा कालावधी एका महिन्यांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात अवकाशात रॉकेट सोडण्यासाठी प्लाझ्मा तंत्रज्ञानाचा वापर अधिक होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

अवकाशामध्ये मोठ्या प्रमाणात फिरत असलेले निकामी झालेल्या सॅटेलाईटचा कचरा हे अवकाश संशोधनातील महत्त्वाची समस्या आहे. सध्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये जवळपास पाच लाखांपेक्षा अधिक सॅटेलाईट फिरत आहेत. यामधील चार हजारपेक्षा अधिक सॅटेलाईट हे निकामी झालेले आहेत. त्यामुळे यांना चुकवून उपग्रह अवकाशात सोडणे ही एक मोठी समस्या आहे. स्पेस मिशनसाठी सॅटेलाईटची डिझाइन करणे हेही एक मोठे आव्हान संशोधकांसमोर असते. कमी ऊर्जेचा वापर करून सॅटेलाईट अवकाशात कसे सोडता येईल यावर फार संशोधन करावे लागते. त्याचप्रमाणे मानवरहित अवकाश यानामधून अवकाशात जाणार्‍या संशोधकांना अनेक आरोग्यांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये संशोधकांना स्नायू दुखणे, किडनी खराब होणे, डोळे बाहेर येणे, मेेंदुला थकवा येणे, विचार करण्याची पद्धत बदलणे यासारख्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -