घरमुंबईशिवसेनेशिवाय भाजपची सत्ता स्थापनेची तयारी!

शिवसेनेशिवाय भाजपची सत्ता स्थापनेची तयारी!

Subscribe

शपथविधीसाठी ५ नोव्हेंबरला वानखेडेचे बुकिंग

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले राजकीय नाट्य काही केल्या संपताना दिसत नाही. निवडणूक निकालाच्या आठवडाभरानंतरही शिवसेना-भाजपचा सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटणे कठीण होत चालला आहे. मात्र, या सर्व घडामोडींनंतरही भाजप पूर्णपणे सत्ता स्थापनेच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. ५ किंवा ६ नोव्हेंबरला भाजपच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. विशेष म्हणजे तोपर्यंत शिवसेनेची मनधरणी करण्यात भाजपला यश आले तर ठिक अन्यथा शिवसेनेशिवाय भाजप मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी समारंभाच्या नियोजनाची जबाबदारी आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्याकडे देण्यात आल्याचे समजते.

मुख्यमंत्रीपदावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा टोकाला गेले आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला शह देऊन एकहाती सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजपने मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी तयारी सुरु केली आहे. येत्या ५ किंवा ६ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भाजप मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना सोबत आली तर ठिक अन्यथा शिवसेनेशिवाय हा मंत्रिमंडळ सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे जर खरेच भाजपच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला तर शिवसेनेला मोठा झटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेना यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisement -

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, २०१४ साली भाजपच्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ पार पाडल्यानंतर दीड महिन्यांनी भाजप पक्ष सत्तेत सहभागी झाला होता. आतादेखील भाजप अगदी तशाचप्रकारे राजकीय खेळी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. २०१४ साली भाजपकडे सत्ता स्थापन करण्याइतपत संख्याबळ नव्हते. मात्र, तरीही भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह इतर १० महत्त्वाच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने न मागता भाजपला पाठिंबा दिला होता आणि शिवसेना विरोधी पक्षात बसली होती. एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते झाले होते. शेवटी हिवाळी अधिवेशन झाल्यावर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. आताही तसेच करताना शिवसेनेच्या दबावाला बळी न पडण्याचे भाजपने ठरवल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रपती राजवट की अल्पमतातील सरकार
राज्यात सरकार स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाची शिवसेनेबरोबर मंत्रिमंडळाबाबत कोणतीही चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. त्यातच शिवसेनेने चर्चेची दारे बंद केलेली आहेत. त्यामुळे भाजपपुढे दोनच पर्याय शिल्लक उरतात. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करून अल्पमताचे सरकार बनवायचे आणि एक महिन्याच्या कालावधीत बहुमत सिद्ध करायचे, हा पहिला पर्याय. तर दुसरा म्हणजे सरकार स्थापन करण्यास कोणीही समर्थ नसल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपालांकडे करायची. आता या दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय भाजप स्वीकारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एक पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजप, शिवसेना आणि मित्र पक्ष या युतीला बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत अद्याप एकमत झालेले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी ५०-५० चा फॉर्म्युला ठरला असून त्यानुसारच आम्ही सरकारमध्ये सहभागी होऊ असे स्पष्ट केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५० चा फॉर्म्युला हा जागावाटपाबद्दल होता. मुख्यमंत्रीपदासाठी नाही, असे सांगत शिवसेनेला १३ मंत्रीपदे आणि उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. पण शिवसेनेने ही ऑफर धुडकावून लावत चर्चेची दारे बंद करून घेतली आहेत.

या परिस्थितीत भाजपकडे असलेला पहिला पर्याय म्हणजे सर्वात मोठा पक्ष म्हणून अल्पमताचे सरकार स्थापन करायचे. राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करायचा. एकदा का सरकार स्थापन झाले की बहुमत सिद्ध करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मिळतो. या काळात इतर राजकीय पक्षांशी आणि अपक्षांशी तडजोड करून बहुमत मिळवण्याचे प्रयत्न करायचे. दरम्यानच्या काळात इतर पक्षातील नाराज आमदारांना मंत्रीपदाचे लालूच दाखवून आपल्याकडे खेचून घेता येता. या पर्यायातून बहुमत सिद्ध झाले की, भाजपचे स्वबळावरील सरकार होऊन देवेंद्र फडणवीस पाच वर्षांसाठी पुन्हा मुख्यमंत्रीपदावर कायम राहातील.

दुसरा पर्याय म्हणजे राष्ट्रपती राजवटीचा. राज्यात ९ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. दरम्यानच्या काळात सरकार स्थापन होऊ शकत नाही, असे स्पष्ट झाल्यावर राज्यपालांकडे थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करायची. राष्ट्रपती राजवटीत राज्यपाल प्रमुख असतात. ते अर्थातच केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करतात. केंद्रात भाजपचेच सरकार असल्यामुळे राज्यातही अप्रत्यक्षरित्या भाजपचेच सरकार असणार. या अवस्थेत सहा महिने काढायचे आणि मग पुन्हा मध्यावधी निवडणुकांना सामोरे जायचे.आता भाजप या दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय अवलंबणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

भाजपने हिंमत करू नये संजय राऊतांचा टोला                                                                    महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहायचा आहे. जर उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, तर मी लिहून देतो की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. आम्ही ठरवले तर बहुमत सिद्ध करून आमचा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची हिंमत करू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला दिला आहे.

राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्ता वाटपाच्या गोंधळासंदर्भात राऊत यांनी सलग दुसर्‍या दिवशी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे. भाजप फार मोठी माणसे आहेत, आम्ही त्यांना काय अल्टिमेटम देणार? आमचा साधा पक्ष आहे. भाजप पक्ष आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. जगभरात त्यांचे कार्यकर्ते, अनुयायी आहेत. आम्ही फक्त महाराष्ट्राबद्दल बोलतो’, अशीही कोपरखळी राऊत यांनी मारली.

भाजपच्या बहुमताच्या दाव्यांचादेखील त्यांनी यावेळी समाचार घेतला. ‘शिवसेना आणि भाजपमध्ये युती आहे. हे दोन्ही पक्ष युतीत असताना त्यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा का सुरू केली नाही? आणि जर त्यांच्याकडे बहुमत आहे, तर मग शपथविधीसाठी इतके दिवस का लावत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी आजही मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला आमची हरकत नाही’, असे राऊत यावेळी म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी त्यांच्या ‘त्या’ ट्वीटवर देखील खुलासा केला. ‘साहिब, मत पालिए अहंकार को इतना, वक्त के सागर में कई सिकंदर डूब गए..!’ असं ट्वीट संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी केले होते. मात्र, ‘या ट्वीटचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही, मी ट्वीटमध्ये भाजपचा उल्लेख केलेला नाही’, असं म्हणत राऊत यांनी थेट स्पष्टीकरण देणे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -