घरमुंबईवाढीव दराने निविदा भरणार्‍या कंत्राटदारांची आयुक्तांनी घेतली शाळा

वाढीव दराने निविदा भरणार्‍या कंत्राटदारांची आयुक्तांनी घेतली शाळा

Subscribe

मुंबईतील आगामी रस्ते विकासकामांच्या कंत्राट कामांमध्ये २० ते ४५ टक्के जास्त दराने बोली लावणार्‍यांची शाळा महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी घेतली. बुधवारी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी कंत्राट कामांमधील पात्र कंत्राटदारांची बैठक घेतल्यानंतर गुरुवारी आयुक्तांनी या सर्वांची चर्चा करून दहा टक्के अधिक दरामध्ये काम करण्यास तयार असाल तर ठिक, अन्यथा फेरनिविदा काढली जाईल, असाच इशारा दिला. मात्र, याला काही कंत्राटदार तयार असले तरी बहुसंख्य कंत्राटदार तयार नसल्याने आयुक्तच स्वत: द्विधा मनस्थितीत सापडले आहेत.

मुंबई महापालिकेच्या वतीने तब्बल ८६२ कोटी रुपयांच्या रस्ते कंत्राट कामांच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे ६०० कोटी रुपये काँक्रीटीकरणासाठी तर २३३ कोटी रुपये डांबरी रस्त्यांचा समावेश यामध्ये आहे. या निविदांमधील सिमेंट काँक्रीटच्या २९९ रस्त्यांच्या कामांसाठी ६०० कोटी रुपयांच्या निविदा मागवण्यात आल्या. परंतु, यामध्ये कंत्राटदाराने बोली लावलेल्या रकमेतील ६० टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर दिली जाईल आणि ४० टक्के रक्कम रोखून ठेवत त्याचे वितरण हमी कालावधी संपेपर्यंत केले जाईल, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राट रकमेच्या केवळ ६० टक्केच रक्कम मिळणार असल्याने एरवी अंदाजित रकमेच्या १५ ते २० टक्के कमी बोली लावून काम मिळवणार्‍या कंत्राटदारांनी चक्क २० ते ४५ टक्के अधिक दराने बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सुमारे ३०० कोटी रुपये अतिरिक्त खर्च होणार असून एक प्रकारे ६० टक्क्यांच्या रकमेतच कंत्राट कामांची शंभर टक्के रक्कम आपल्या खात्यात वळती करून घेण्याची कंत्राटदारांची चाल आहे.

- Advertisement -

याबाबबत भाजपचे प्रभाकर शिंदे आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिका स्थायी समितीत तसेच भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी विधीमंडळात आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने या कंत्राटदारांशी वाटाघाटी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार बुधवारी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी या कंत्राट कामांमधील सर्व कंत्राटदार आणि अधिकार्‍यांची बैठक बुधवारी आपत्कालीन नियंत्रण कक्षातील सभागृहात घेतली. यामध्ये कंत्राटदारांना कितीपर्यंत दर कमी करता येईल याबाबत विचारणा करून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये कंत्राटदारांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे गुरुवारी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासमोर सर्वांची परेड झाली. यावेळी परदेशी यांनी सर्व कंत्राटदारांची शाळा घेत, आपण किती बोली लावली हे मला माहित नाही, पण तुम्ही दहा टक्के अधिक दराने काम करायला तयार आहात काय, अशी विचारणा केली. यावर कंत्राटदारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला असून जे कंत्राटदार २० ते २५ टक्के अधिक दराने काम मिळवण्यास पात्र ठरले आहेत, तेच यासाठी तयार झाले आहेत. परंतु ज्या कंत्राटदारांनी २५ ते ४५ टक्के अधिक दराने बोली लावली आहे, त्यांना मात्र दहा टक्केच अधिकने काम करण्यास नकार दिल्यामुळे ही वाटाघाटी यशस्वी ठरली नाही. त्यामुळे आयुक्त आता याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जे कंत्राटदार दहा टक्के अधिक दराने काम करण्यास तयार झाले असतील त्यांना काम देऊन उर्वरीत कामांची कंत्राटे रद्द करतात की दहा टक्के अधिक दराने दिल्यानंतरही दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपये अधिक जाणार असल्याने या सर्वच कंत्राट कामांच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -