घरमुंबईविधीमंडळ अधिवेशनासाठी पालिकेच्या उद्यान विभागाची तयारी!

विधीमंडळ अधिवेशनासाठी पालिकेच्या उद्यान विभागाची तयारी!

Subscribe

मुंबईत अनेक वर्षांनंतर होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने विधिमंडळ परिसर सुशोभिकरणाचं काम हाती घेतलं आहे.

अनेक वर्षांनंतर मुंबईत होत असलेलं महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आणि याच काळात बहराला येणारी विविध प्रकारची फुलझाडं, हा योगायोग लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल ७५० उद्यानांची जबाबदारी असणाऱ्या उद्यान विभागाद्वारे विधीमंडळ व मंत्रालयाच्या जवळील परिसरात ५ हजारांपेक्षा अधिक फुलझाडांची वा शोभेच्या झाडांची रोपं लावून हा परिसर सुशोभित करण्यात येत आहे. या अंतर्गत मंत्रालयाजवळील विविध महत्त्वाच्या मार्गांवर दुभाजकांमधील जागेत सुमारे ३ हजार आकर्षक फुलझाडांची वा शोभेच्या झाडांची रोपं लावण्यात येत आहेत. तर आकर्षक कुंड्यांमध्ये लावण्यात आलेली सुमारे २ हजार फुलझाडांची रोपटी देखील या परिसराचे सौंदर्य वाढविणार आहेत. त्याचबरोबर परिसरातील मोठ्या झाडांना देखील रंगरंगोटी करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

अधिवेशनासाठी विधिमंडळ परिसरात सुशोभिकरण

‘विधीमंडळ हिवाळी अधिवेशन २०१८’ च्या अनुषंगाने आणि मंत्रालयाजवळील परिसरातील मादाम कामा मार्ग, बॅ.रजनी पटेल मार्ग, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, फ्री प्रेस जनरल मार्ग इत्यादी मार्गांच्या दुभाजकांमध्ये वा जंक्शनच्या जागेत हंगामी फुलझाडांची आणि शोभेच्या झाडांची रोपटी लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर याच परिसरात शक्य असेल त्या ठिकाणी फुलझाडांची वा शोभेच्या झाडांची रोपटी असणाऱ्या कुंड्या देखील ठेवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या सुशोभिकरणासाठी फुलझाडांची आणि शोभेची झाडं ही प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘नर्सरी’मध्येच तयार करण्यात आली आहेत. यासाठी उद्यान विभागातील माळी आणि संबंधित कर्मचारी हे गेले दोन महिने रोपांची रुजवण करण्याचे आणि निगा घेण्याचे काम करत आहेत.

- Advertisement -

उद्यान विभागाकजून फुलझाडांची निगा

या परिसरात लावण्यात आलेल्या झाडांमध्ये प्रामुख्याने सदाफुली, झिनिया, पिटुनिया, टोरोनिया, डायांथस, सिलोशिया इत्यादी प्रकारातील झाडांचा समावेश आहे. या फुलझाडांना आणि शोभेच्या झाडांच्या रोपट्यांना नियमित स्वरुपात पाणी देणे आणि त्यांची निगा राखणे ही कामं देखील महापालिकेच्याच उद्यान विभागामार्फत केली जाणार आहेत, अशीही माहिती परदेशी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -