घरमुंबई...तर पालिका रुग्णालयात X-RAY, औषध पुरवठा होणार बंद; पुरावठादारांचे पालिकेने थकवले कोट्यवधी

…तर पालिका रुग्णालयात X-RAY, औषध पुरवठा होणार बंद; पुरावठादारांचे पालिकेने थकवले कोट्यवधी

Subscribe

मुंबई: मुंबई महापालिकेच्या विविध प्रमुख व सर्वसाधारण रुग्णालयात रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यासाठी आवश्यक औषधे, एक्स रे फिल्म आदींचा पुरवठा करणाऱ्या पूरवठादारांची बिले पालिकेच्या नियमातील जाचक बदलांमुळे थेट कंपनीकडे जमा झाल्याने पुरवठादारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. परिणामी त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. जोपर्यंत ही सर्व कोट्यवधी रुपयांची बिले पूरवठादारांकडे जमा होणार नाहीत, तोपर्यंत औषधे व एक्स रे फिल्म आदींचा पुरवठा रोखण्यात येईल, असा इशारा पुरवठादारांनी पालिकेला दिला आहे.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने आदी ठिकाणी ललहान मुलांपासून, महिला, वयोवृद्ध व दिव्यांग रुग्णांना देण्यात येणाऱ्या मोफत औषधोपचार, शस्त्रक्रिया आदीं सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत तोडगा काढण्यासाठी व आपली कोट्यवधी रुपयांची बिले मार्गी लावण्यासाठी पालिका रुग्णालयातील काही पूरवठादारांनी थेट पालिका मुख्यालयात संबंधित अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे धाव घेतली. संध्याकाळी उशिराने प्रशासन व पुरवठादार यांच्यात सदर विषयावर चर्चा झाल्याचे समजते. मात्र निर्णय गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातच सदर एक्स रे फिल्म, औषधे पुरवठादारांच्या गंभीर समस्येचे नेमके काय झाले, काय मार्ग निघाला याबाबत अधिकृत वृत्त समजू शकणार आहे.

- Advertisement -

पालिकेच्या रुग्णालयात मोफत अथवा माफक दरात औषधे, एक्स रे फिल्म आदींचा पुरवठा करून भागविण्यात औषधी कंपन्यांचे पुरवठादार यांची भूमिका खुपच महत्वाची असते. या औषधांचा व एक्स रे फिल्म आदींचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना आतापर्यंत पालिका स्वतः बिलांची रक्कम अदा करीत असे. मात्र गेल्या दोन – तीन महिन्यांपासून पालिकेच्या संबंधित खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अचानकपणे पुरवठादाराकडून औषध व एक्स रे फिल्म यांचा पुरवठा झालेला असताना बिलांची रक्कम पुरवठादारांना न देता परस्पर कंपनीकडे जमा केली. त्यामुळे कंपनीवालेही चक्रावले आहेत. सदर बिलांची रक्कम कुठेव कशी आणि कोणत्या हिशोबाने दाखवावी, हे त्यांनाही कळत नाही.

आमचे लाखो, कोट्यवधी रुपये अडकले आहेत. जर पालिकेने आपल्या नियमांत बदल करून पूर्वीप्रमाणे आमची बिले आम्हाला अदा केली नाहीत तर आम्ही पुढील औषध व एक्स रे आदींचा पुरवठा नाईलाजाने रोखू, असा इशारा वर्षभरासाठी अंदाजे १२ कोटी रुपयांच्या ‘एक्स रे फिल्म’चा पुरवठा करणारे पुरवठादार ‘डिसप्लेअर ट्रेडिंग कॉर्पोरेशन’ चे सुनील देशपांडे यांनी दिला आहे.त्यामुळे या गंभीर समस्येमधून वेळीच तोडगा न निघाल्यास त्याचे विपरीत परिणाम पालिका रुग्णालयीन वैद्यकिय सेवेवर होणार असून रुग्णांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -