घरमुंबईलॉकडाऊनमुळे नोकरी गेली दोघांनी केली आत्महत्या

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली दोघांनी केली आत्महत्या

Subscribe

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा येत आहे. मात्र, कमवण्याचे दुसरे कोणतेच साधन नाही आणि अन्य कोठे नोकरी मिळण्याची अपेक्षा नसल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या दोन तरुणांनी आत्महत्या केली. मुंबईतील कुर्ला येथील पुरुषोत्तम गोरे (31) व ठाण्यातील विनोद गणेरी (28) या दोन तरुणांनी लॉकडाऊनमुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. नोकरी गेल्यामुळे दोन्ही तरुण काही दिवसांपासून नैराश्येत होते.

‘मी आता परत येणार नाही’ असे फोन करून आपल्या वडिलांना कळवत कुर्ला पश्चिमेकडील बेलग्रामी रोड येथे राहणार्‍या पुरुषोत्तम गोरे याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकी आली. पुरुषोत्तम हा एका खासगी वाहनावर चालकाचे काम करत होता. चार वर्षांपूर्वी त्याचा प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर पत्नीसोबत बेलग्रामी रोड, अंजुमन इस्लाम शाळेजवळील चाळीत राहणार्‍या पुरुषोत्तमची लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. पत्नीच्या नोकरीवर त्यांच्या संसाराचा गाडा कसाबसा सुरू होता. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे पत्नी कामावर गेल्यानंतर पुरुषोत्तम हा घरात एकटाच होता, त्याने रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास कुर्ल्यातच राहणार्‍या वडिलांच्या मोबाईलवर फोन करून ‘मी आता परत येणार नाही’ एवढे बोलून फोन ठेवून दिला.

- Advertisement -

मुलाने एवढ्या रात्री फोन करून असा का बोलला म्हणून वडील चिंतेत होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा मुलाला फोन केला, पण तो उचलत नसल्याने त्यांनी शेजार्‍यांना फोन केला. शेजार्‍यांनी पुरुषोत्तमचे दार ठोठावले. मात्र, आतून कुठलीच हालचाल होत नसल्याचे शेजार्‍यांनी त्याच्या वडिलांना सांगितले. रात्री ३ च्या सुमारास वडील आणि भाऊ दोघे पुरुषोत्तमच्या घरी आले व त्यांनी शेजार्‍यांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला असता पुरुषोत्तम हा गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला. घटनास्थळी दाखल झालेल्या कुर्ला पोलिसांनी पुरुषोत्तमच्या गळ्याचा फास काढून त्याला भाभा रुग्णालय आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आई वडिलांसह राहणारा विनोद हा एका मार्केटिंग कंपनीत नोकरीला होता. लॉकडाऊनच्या काळात त्याची नोकरी गेल्यामुळे तो काही दिवसांपासून नैराश्यात होता. शुक्रवारी त्याने ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या हॉटेल आयलँडमध्ये एक खोली बुक केली होती. रात्री उशिरा हॉटेलचे कर्मचार्‍यांनी त्याच्या खोलीचे दार ठोठावले. खोलीतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याची बाब हॉटेल व्यवस्थापक यांना देण्यात आली. व्यवस्थापक यांनी बनावट चावीने दार उघडले असता विनोद हा गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आला. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल आयलँडच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -