घरमुंबईपूल वेळेत बांधा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन

पूल वेळेत बांधा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन

Subscribe

महानगराच्या वृत्तानंतर मनसेचा रेल्वेला दणका

सांताक्रूझ रेल्वे स्थानकांचा पूर्व-पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल अजूनही अपूर्णावस्थेत असल्यामुळे सांताक्रूझ रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर तुडुंब गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे इथेही एल्फिस्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. यासंबंधी दैनिक ‘आपलं महानगर’ने ‘सांताक्रुझवर एल्फीस्टनचे सावट’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुढाकार घेत या ठिकणचा अपूर्णावस्थेत असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी पश्चिम रेल्वेकडे केली आहे, तसे लेखी आश्वासनच लिहून घेतले आहे. जर हा पूल ३१ डिसेंबरपर्यंत खुला केला नाही, तर मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेनेने दिला आहे.

सांताक्रूझ रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीच्या नावाखाली 12 सप्टेंबर 2018 रोजी रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केला आहे. 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत हा पूल पादचार्‍यांसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिले होते. या आश्वासनाचा फलकदेखील रेल्वेने स्थानकावर लावला होता. बांधकामाची मुदत संपून आज कित्येक दिवस पूर्ण झाले आहेत. पण पुलाचे 10 टक्केही काम अजून पूर्ण झालेले नाही. लावलेला फलक काढण्यात आला आहे. या संबंधित वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकशित केले होते. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी या संबंधित दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाला हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निवेदन देण्यात आले होते. मात्र तरी सुद्धा रेल्वे प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यार्ंंनी बुधवारी पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांच्या कार्यालयात धडक दिली. जोपर्यंत या पादचारी पूलाचे काम पूर्ण होण्याची लिखित तारीख देत नाही तोपर्यंत आम्ही इथेच ठिय्या देऊन बसणार, असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला होता. त्यानंतर पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकुंद जैन यांनी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत या पुलांची दुरुस्ती पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली.

- Advertisement -

प्रवाशांच्या जीवाशी खेळ

सांताक्रूझ रेल्वे स्थानकावर दर दिवशी होणारी प्रवाशांची ये-जा पाहता या पुलाच्या दुरुस्तीचा दिलेला कालावधी खूप जास्त आहे. एका वेळी दोन ठिकाणी दुरुस्ती होत असल्याने एकाच पुलावर सर्व प्रवाशांना ये-जा करावी लागते. पूर्व-पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल बंद असल्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे प्रवासी, शाळा-कॉलेजमध्ये जाणारी मुले याच पुलाचा वापर करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेस रेल्वेच्या मुख्य पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते. पूल चढून प्लॅटफॉर्मवर जायलाच 15 मिनिटे लागतात. अशा वेळेस एल्फिन्स्टन पुलावर घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. सुस्तावलेले रेल्वे प्रशासन अशा दुर्घटनेची वाट पाहत आहे का? पुलाचे काम पूर्ण करायला त्यांना कोणता मुहूर्त हवा आहे? प्रवाशांना रोज पादचारी पुलावरून स्थानकावर जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

सांताक्रूझ पूर्व रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे खात्यामार्फत पादचारी पुलांची दुरुस्ती करण्यात येत आहे. या दुरुस्तीच्या कालावधीमध्ये एल्फिन्स्टन रेल्वे पुलासारखी एखादी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी मनसेकडून पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र पश्चिम रेल्वेकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत होती. त्यामुळे आता आम्ही ३१ डिसेंबरची लिखित डेडलाईन मागितली, तशी डेडलाइन पश्चिम रेल्वेने दिली आहे. या समयमर्यादेत जर पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर रेल्वेच्या विरोधात मनसे स्टाईलने आंदोलन करू.
-अखिल चित्रे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -