घरमुंबईशिळफाट्यात मनसेने बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण बंद पाडले

शिळफाट्यात मनसेने बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण बंद पाडले

Subscribe

मनसेच्या कार्यकर्त्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत सापडण्याचे चित्र दिसू लागले आहे. मनसेने आधीपासूनच या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. त्यात वसई-विरारमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरेंनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे रूळ उखडून टाका, असं आवाहन केल्यानंतर या प्रकल्पाविरोधात हा पक्ष आक्रमक झाल्याचे दिसू लागले. बुलेट ट्रेन प्रकल्पाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा जबरदस्त विरोध आहे आणि त्यांनी हे जाहीर केले आहे की, मुंबईची उपनगरी रेल्वेसेवा सुधारत नाही तोपर्यंत ते या प्रकल्पाची उभारणी करू देणार नाहीत.

“मी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एक विटदेखील ठेवू देणार नाही. पहिल्यांदा मुंबईतील प्रवाशांच्या सर्व मुलभूत समस्यांचे निराकरण करा. मोदींना जर हवे असेल तर त्यांनी गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम करू द्यावे,” असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. एल्फिन्स्टन स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत सप्टेंबर २०१७ मध्ये ३० जणांचा मृत्यू झाला होता. ठाकरे यांनी १ मे रोजी राज्यव्यापी दौरा सुरू केला.

- Advertisement -

शीळफाट्याजवळ बुलेट ट्रेनच्या कामाचे सर्वेक्षण करायला आलेल्या अधिकाऱ्यांच्या कामात मनसेच्या कार्यकर्त्यांनी अडथळे आणत हे काम बंद पाडले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला कामकाज पुन्हा सुरू करू दिले नाही. सुमारे ३९.६६ किमीचा बुलेट ट्रेन मार्ग ठाणे जिल्ह्यातून जाणार आहे. या मार्गात येणाऱ्या गावांपैकी शीळ हे एक गाव आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प झाला तर या गावातील अनेक शेतकऱ्यांना त्याच्या जमिनी गमवाव्या लागतील. त्यामुळे केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मनसेसह स्थानिकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. शीळ या गावातील २.४१ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची सरकारची योजना आहे.

जिल्हाधिकारी गेल्या काही दिवसांपासून शीळमधील जमिनीचे सर्वेक्षण करत आहेत. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की, ‘या प्रकल्पाला आमचा विरोध आहे आणि तो बंद पाडण्यासाठी आम्ही रोज आंदोलन करु. आम्ही आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारच्या ताब्यात देणार नाही. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची गरज नाही. ही फक्त भाजपच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठीची योजना आहे. महाराष्ट्रात इतरही महत्त्वाचे मुद्दे आहेत.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -