घरमुंबईएसआरएमध्ये झोपड्या पात्र करण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत

एसआरएमध्ये झोपड्या पात्र करण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत

Subscribe

छोटा शकीलच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए) मध्ये अपात्र ठरलेल्या झोपड्या पात्र ठरवण्यासाठी एका झोपडपट्टी दादाने थेट अंडरवर्ल्डची मदत घेतल्याचा प्रकार मुंबईतील पश्चिम उपनगरात उघडकीस आला आहे. कुख्यात दाऊद इब्राहिमचा टोळीचा गँगस्टर छोटा शकील याचा भाऊ अन्वर याने बांधकाम व्यावसायिकाला आंतरराष्ट्रीय कॉल करून धमकवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली आहे.

शेख अरबाज नईम आणि राजू उर्फ कामरान असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जोगेश्वरी येथील एका झोपडपट्टीत एसआरएची योजना राबवण्यात येत आहे. या झोपडपट्टीत अरबाज याच्या ६ खोल्या असून त्यापैकी पाच खोल्या एसआरएने अपात्र ठरवल्या असून १ झोपडी पात्र ठरवली आहे. अपात्र ठरवलेल्या खोल्या देखील पात्र ठरवून त्या मोबदल्यात ६ फ्लॅट पाहिजे अशी मागणी अरबाज याने बांधकाम व्यावसायिकाला केली होती. मात्र, या खोल्या एसआरएने अपात्र ठरवलेल्या असल्याचे बांधकाम व्यावसायिकाने सांगितले.

- Advertisement -

अखेर अरबाजने राजू उर्फ कामरान याला मध्यस्थी टाकले, राजू उर्फ कामरान हा छोटा शकील याचा भाऊ अन्वर याच्या संपर्कात असल्यामुळे त्याने अरबाज सोबत अन्वरशी फोनवर बोलणे करून दिले. त्यानंतर त्यांचा आपसात व्यवहार ठरला. त्यानंतर अन्वर याने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून बांधकाम व्यावसायिकाला छोटा शकीलचा भाऊ बोलत असल्याचे सांगत अरबाजच्या सर्व झोपड्या पात्र ठरवून त्याला मोबदल्यात ६ घरे देण्यात यावी. तसेच मला देखील माझा वाटा पाहिजे, असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण आणि पथकाने अरबाज आणि राजू उर्फ कामरान या दोघांना अटक केली आहे. अन्वर हा परदेशात दडून बसला असून छोटा शकीलच्या नावाखाली तो मुंबईत खंडण्या वसूल करीत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -