घरदेश-विदेशचीन, पाकिस्तानचा तालिबान्यांकडे मैत्रीचा हात; भारताची चिंता वाढली

चीन, पाकिस्तानचा तालिबान्यांकडे मैत्रीचा हात; भारताची चिंता वाढली

Subscribe

तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशात अफरातफरी माजली आहे. क्रूर तालिबान्यांपासून आपल्या जीविताचे रक्षण करण्यासाठी हजारो अफगाण नागरीक विमानतळाच्या दिशेने गेले. काहीजण अमेरिकन हवाईदलाच्या विमानाच्या चाकांवर, इंजिनवर चढून बसले. मात्र, विमानाने टेकऑफ घेताच काहीजणांचा खाली पडून मृत्यू झाला. विमानतळावर जाण्यापासून रोखण्यासाठी तालिबानी दहशतवाद्यांनी आपल्या नागरिकांवर गोळीबारही केला. त्यात पाचजण मृत्युमुखी पडले. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये तालिबान प्रशासन आल्यामुळे पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. तर चीनने तालिबान्यांसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. तालिबान्यांना मात्र भारताशी मैत्रीपूर्ण संबंधाची अपेक्षा असून आपण भारत, पाकिस्तानदरम्यानच्या कोणत्याही वादात पडणार नाही, असे आश्वासनही तालिबान्यांकडून देण्यात आले आहे.

अफगाणिस्तानमध्ये गोंधळ माजला आहे. सत्ता हाती घेताच तालिबानी दहशतवाद्यांकडून अफगाणिस्तानच्या सरकारी कर्मचार्‍यांचा शोध घेण्यात येत आहे. तालिबानी दहशतवादी घरोघरी जाऊन शोध घेत आहेत. अफगाणिस्तानमधील महिलांवर पुन्हा बंधने लादण्यात आली आहेत. बुरख्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे स्पष्ट आदेश तालिबानी दहशतवाद्यांनी महिलांना दिले आहेत. तालिबानच्या समर्थकांनी अफगाणिस्तानच्या सामान्य नागरिकांकडे असलेली शस्त्रास्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तालिबानची राजवट असल्याने नागरिकांना खासगी शस्त्रास्त्रे बाळगण्याची गरज नसल्याचे तालिबान्यांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय तालिबानकडून बँकेत काम करणार्‍या महिलांनी कामावर येऊ नये, असा फतवा काढण्यात आलाय. महिला कर्मचार्‍यांनी हे विचित्र आहे; पण वास्तव असल्याचे म्हटले.

- Advertisement -

पाककडून तालिबानचे स्वागत
अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानी सत्तेचे स्वागत केले आहे. गुलामगिरीच्या जोखडातून तालिबानची सुटका झाली. जेव्हा आपण दुसर्‍यांची संस्कृती आत्मसात करतो तेव्हा आपण मानसिकरित्या गुलाम होतो. सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर येणे सोपे नसते. अफगाणिस्तानात आता जे काही होत आहे, ते गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासारखे आहे, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.

चीनकडून मैत्रीचा हात
तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास चीन तयार असल्याचे म्हटले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करू इच्छितो.”

- Advertisement -

भारताकडून मैत्रीची अपेक्षा
भारताकडून आम्हाला मैत्रीची अपेक्षा आहे. भारत लवकरच आपल्या भूमिकेत बदल असेल अशी आशा आहे. कारण याआधी भारत येथे थोपविण्यात आलेल्या सरकारची बाजू घेऊन बोलत होता. त्यामुळे आता येणार्‍या नव्या सरकारची ते बाजू घेतील. कारण दोन्ही देशांसाठी हेच फायद्याचे ठरेल, असे तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीनने म्हटले आहे. मात्र, भारत, पाकिस्तान वादात आपण पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पैसे घेऊन राष्ट्रध्यक्ष घनी पळाले
तालिबानच्या भीतीने अफगाणिस्तानातून पळून गेलेले राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी रोख रकमेने भरलेल्या चार कार आणि हेलिकॉप्टरसह काबूलला रवाना झाले होते. अशरफ घनी यांना सर्व पैसे सोबत घेऊन जाता आले नाहीत म्हणून त्यांना काही पैसे मागे ठेवावे लागले. काबुलमधील रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इंश्चेन्को यांनी सांगितले की, चार कार रोख रकमेने भरलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी काही रक्कम हेलिकॉप्टरमध्ये ठेवली. यानंतरही, ते सर्व पैसे ठेवू शकले नाहीत आणि काही पैसे असेच सोडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -