घरमुंबईगटारगंगेतून ज्ञानगंगेच्या प्रवाहात! सफाई कामगारांचा हीरो सुनील यादव

गटारगंगेतून ज्ञानगंगेच्या प्रवाहात! सफाई कामगारांचा हीरो सुनील यादव

Subscribe

मुंबई महापालिकेत सफाई कामगार असलेला सुनील यादव शेकडो कर्मचार्‍यांचा आदर्श बनला आहे. सुनीलचा संघर्ष बघून पालिकेतील शेकडो कर्मचारी शिक्षण घेण्यास प्रवृत्त झाले आहेत.

कोणत्याही एखाद्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी त्याच क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तीला आपले आदर्श मानले जाते. त्यांचे मार्गदर्शन घेऊन किंवा त्यांनी दिलेल्या मार्गावर चालून अनेकजण यशस्वी होतात. मुंबई महापालिकेत सफाई कामगार असलेला सुनील यादव असाच शेकडो कर्मचार्‍यांचा आदर्श बनला आहे. सुनीलचा संघर्ष बघून पालिकेतील शेकडो कर्मचारी शिक्षण घेण्यास प्रवृत्त झाले आहेत. मुंबई महापालिकेत काम करणारा सफाई कामगार असो किंवा वरिष्ठ अधिकारी असो सुनील यादव हे नाव सगळ्यांना माहीत आहे. सुनील यादव याचे शिक्षण २००५ साली पालिकेची नोकरी लागल्यावर सुरू झाले. पहिल्याच दिवशी हाऊस गल्लीमधील कचरा साफ करताना आपले पूर्वज हेच काम करता करता मेले. पण आपण त्यांच्यासारखे मरायचे नाही. या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे, असा विचार करत सुनीलने शिक्षणाचा मार्ग स्वीकारला.

सुनील बनला शेकडो कर्मचार्‍यांचा आदर्श

पालिकेच्या कायद्यात तरतूद असूनही एक सामान्य सफाई कर्मचारी असल्याने सुनीलला शिक्षणासाठी रजा नाकारण्यात आली. पालिका, राज्य सरकार, एससी एसटी आयोगापासून न्यायालयापर्यंत संघर्ष केल्यावर सुनीलला शिक्षणासाठी रजा मंजूर झाली. सुनील आज पीएचडी करत आहे. सुनीलचा संघर्ष पालिकेतील कर्मचार्‍यांमध्ये पोहचला आणि सुनील शिकू शकतो, मग आपण का नाही, असा प्रश्न त्यांना पडला. त्यामधून अनेकांची पावले शिक्षणाच्या वाटेवर पडली आहेत. सुनीलला आदर्श मानणार्‍यांपैकी एक म्हणजे ड्रेनेज सफाईचे काम करणारे विजय तळेकर. तळेकर सुनीलच्या बाजूलाच सातरस्ता धोबीघाट येथे राहत होते. आजूबाजूच्या परिसरात गँगवार चालू असे. इयत्ता ९ वी पर्यंतच त्यांचे शिक्षण झाले होते. १९८६ साली तळेकर पालिकेत कामगार म्हणून कामाला लागले. आपला मित्र सुनील शिकत असलेला पाहून त्यांनीही शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

टाटा इन्स्टिट्यूटमधून पीएचडी मिळवण्याचा प्रयत्न

रात्र शाळा, आरएम भट्ट रात्र विद्यालयामधून कॉलेज करत तळेकर यांनी आतापर्यंत एलएलबी, डिप्लोमा इन लेबर लॉ, एम. ए, या पदव्या मिळवल्या आहेत. सध्या तळेकर टाटा इन्स्टिट्यूटमधून पीएचडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. इंटरव्ह्यूपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. आज तळेकर हे पालिकेत कनिष्ठ अवेक्षक म्हणून कामाला आहेत.


अजेयकुमार जाधव, मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -