घरमुंबई‘मिशन पावसाळा मलमपट्टी’साठी कोल्डमिक्सचा साठा

‘मिशन पावसाळा मलमपट्टी’साठी कोल्डमिक्सचा साठा

Subscribe

पालिकेकडून सर्व विभागांना साठा वितरीत

मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रकार लक्षात घेता महापालिका प्रशासनाने खड्डामुक्तीसाठी कंबर कसली आहे. मुंबईतील सर्व खराब रस्त्यांची कामे टप्प्याटप्याने हाती घेण्यात आल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत,असा दावा प्रशासनाने केला असला तरी मुसळधार पावसामुळे खड्डयांची समस्या निर्माण झाल्यास सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेने सुमारे १२०० मेट्रीक टन कोल्डमिक्सचा साठा करून ठेवला आहे. या १२०० मेट्रीक टन कोल्डमिक्सचा पुरवठा सर्व २४ विभाग कार्यालयांना करण्यात आला आहे. याशिवाय ३०० मेट्रीक टन कोल्डमिक्सचा साठा वरळीतील प्लांटमध्ये करून ठेवला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मुंबईतील रस्त्यांचा विकास करण्यासाठी तसेच खड्डे बुजवण्यासाठी मागील वर्षीपासून कोल्डमिक्स तंत्राचा वापर केला जात आहे. यापूर्वी वापरण्यात येणार्‍या हॉटमिक्स ऐवजी कोल्डमिक्सचा वापर होत असून हे कोल्डमिक्स महापालिकेच्या वरळी येथील अस्फाल्ट प्लांटमध्ये बनवण्यात येत आहे. मागील वर्षी कोल्डमिक्सवरून महापालिकेच्या रस्ते विभागाला स्थायी समितीसह नगरसेवकांनी धारेधर धरून हे कोल्डमिक्स बंद करावे,अशी मागणी करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. हे कोल्डमिक्स तंत्र अवघ्या २७ रुपयांमध्ये उत्पादित केले जात आहे. मात्र, मागील वर्षीच्या अनुभवावरून महापालिका प्रशासनाने यावर्षी कोल्डमिक्सचा साठा करून ठेवला आहे.

- Advertisement -

मागील वर्षी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी ८८० मेट्रीक टन कोल्डमिक्सचा वापर केला होता. मात्र यावर्षी १२०० अधिक ३०० याप्रमाणे १५०० मेट्रीक टन कोल्डमिक्सचे उत्पादन केले जात आहे. आतापर्यंत १२०० मेट्रीक टन कोल्डमिक्सचा पुरवठा २४ विभाग कार्यालयांना करण्यात आला आहे.

प्रत्येक विभागाने मागणी केल्याप्रमाणे त्यांना ५ मेट्रीक टनचा साठा अधिक देण्यात आला आहे. पावसाळ्यात काही अपवादात्मक एक ते दोन रस्त्यांच्या कामांना परवानगी दिली जाईल. वाहतूक पोलीसांची परवानगी घेवूनच त्या कामांना सुरुवात केली जाईल. – विनोद चिठोरे, माहिती संचालक (अभियांत्रिकी विभाग)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -