घरमुंबईसायन-पनवेल महामार्गावरील कोंडी फुटणार

सायन-पनवेल महामार्गावरील कोंडी फुटणार

Subscribe

खांदा कॉलनीचा उड्डाणपूल खुला

सायन-पनवेल महामार्गावर खांदा कॉलनी सिग्नलजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, तो सोमवारपासून वाहनांसाठी खुला झाला आहे. त्यामुळे खांदेश्वर रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या मार्गावर होणारा खोळंबा दूर होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई-पुणे महामार्गाचे कळंबोली ते शेडूंगपर्यंतचे रुंदीकरण करण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू करण्यात आले. एमएमआरडीएकडून यासाठी 197 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये पनवेल शहराला लागून असलेल्या गाढी नदीवरील पूल, खांदा कॉलनी सिग्नलजवळचा उड्डाणपूल आणि काळुंद्रे नदीवरील पूल अशा तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मागील दोन वर्षांपासून वेगाने कामे सुरू असून, आसूडगाव ते खांदा कॉलनी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे.

खांदा कॉलनी उड्डाणपुलाचे काम रविवारी पूर्ण झाल्यानंतर रंगरंगोटी करण्यात आली. काम पूर्ण होताच कोणत्याही उद्घाटनाची प्रतीक्षा न करता वाहनांसाठी पूल सुरू करण्यात आला. या उड्डाणपुलामुळे मुंबई, ठाण्याहून पनवेलकडे येणारी वाहने, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याच्या, गोव्याच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना खांदा कॉलनी सिग्नलवर थांबावे लागणार नाही. खांदा कॉलनी सिग्नल ओलांडला की हार्बर मार्गावरील रेल्वेचा पूल ओलांडून थेट ठाणे नाका गाठता येणार आहे. याशिवाय पनवेल, पुणे, गोव्याची वाहने उड्डाणपुलावरून धावू लागल्यामुळे खांदा कॉलनी सिग्नलची गर्दी कमी होऊन खांदा कॉलनी, नवीन पनवेल, आदईहून खांदेश्वर रेल्वेस्थानक, कळंबोली, कामोठ्याच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना सिग्नलवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. या उड्डाणपुलासाठी 3 कोटी 45 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. गाढी नदीवरील पूल मागील महिन्यात पूर्ण झाल्यामुळे पनवेल शहरातील कोंडीची ठिकाणे आता कमी झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

दोन महिन्यांत तीन पूल
गाढी नदीवर अनेक वर्षांपासून असलेल्या मुंबई-पुणे महामार्गावरील उड्डाणपूल अपुरा पडत असल्यामुळे दुसरा पूल बांधण्यात आला. त्यामुळे येथील कोंडी सुरळीत झाली. महापौरांच्या हस्ते या पुलाचे मागील महिन्यात उद्घाटन करण्यात आले. मागील आठवड्यात पनवेल-मुंब्रा महामार्गावरील कळंबोलीचा उड्डाणपूल सुरू करण्यात आला. आता सोमवारपासून खांदा कॉलनी सिग्नल येथील उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे वाहनचालकांचा मार्ग सुरळीत होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -