घरCORONA UPDATECorona Update : तिसरी लाट रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज; चाचण्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग...

Corona Update : तिसरी लाट रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज; चाचण्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणार

Subscribe

आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी पूर्वतयारी सुरु केली आहे.

युरोप, अमेरिकेतील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अधिक सतर्क झाली आहे. पालिकेची विविध रुग्णालये, जंबो कोविड सेंटर आदी ठिकाणी खाटांची संख्या, कोविड उपचार केंद्र आणि रुग्णालये इत्यादींची संख्या वाढवण्यात येणार आहे. पालिका आरोग्य यंत्रणा २४ तास अधिक सुसज्ज ठेवण्यात येणार असून कोविड चाचण्यांची संख्याही वाढवण्यात येईल. त्याचप्रमाणे, प्रतिबंधित क्षेत्रांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे इत्यादी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी पूर्वतयारी सुरु केली आहे. तसेच महापालिकेची ७ परिमंडळे आणि २४ विभाग कार्यालयांशी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि पालिकेच्या पूर्वतयारीची अंलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -
  • पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान उभारण्यात आलेली कोविड उपचार केंद्रे आवश्यक मनुष्यबळासह यंत्रणा अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • कोविड विषयक वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोविड चाचण्यांची संख्या अधिकाधिक वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • वैद्यकीय उपचारात ‘आरटीपीसीआर’ आणि ‘रॅपिड अँटीजेन’ या दोन्ही प्रकारच्या कोविड चाचण्यांचा समावेश करण्यात यावा. तसेच आवश्यक ‘किट’ उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग 

कोविड या साथरोगाच्या प्रसारास अटकाव व्हावा, या उद्देशाने कोविड बाधित रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ केले जाते. या अनुषंगाने प्रत्येक बाधित रुग्णामागे १५ व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत होते. हे प्रमाण वाढवून आता प्रत्येक रुग्णामागे २० व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे.

  • प्रतिबंधित क्षेत्र आणि बाधित रुग्णांचा पाठपुरावा

प्रतिबंधित क्षेत्रांमधील बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्या स्तरावर अधिकाधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पाठपुरावा नियमितपणे करण्याच आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -
  • विभागस्तरीय नियंत्रण कक्षांचा आढावा व प्रशिक्षण

कोविड विषयक व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि अधिक सुयोग्यप्रकारे करण्यासाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये विभागस्तरीय नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जम्बो कोविड रुग्णालये आणि उपचार केंद्रांबाबत 

महापालिकेने अल्पावधीत कार्यान्वित केलेली जम्बो कोविड रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्र इत्यादी ठिकाणी असणाऱ्या सोयी-सुविधा, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या बाबींचा पुरवठा, साफसफाई व स्वच्छता विषयक सेवा, खानपान सेवा इत्यादींबाबत देखील आढावा घेण्यात येत आहे.

  • कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन

कोविड प्रतिबंधासाठी, सार्वजनिक ठिकाण मुखपट्टी वापरणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर असणे, वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे या त्रिसूत्रांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालिकेची पूर्वतयारी

महापालिका क्षेत्रात सध्या वरळी परिसरातील एनएससीआयमध्ये उभारण्यात आलेले जम्बो कोविड रुग्णालय, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील जम्बो कोविड रुग्णालय, गोरेगाव परिसरातील नेस्को येथील जम्बो कोविड रुग्णालय, बृहन्मुंबई महापालिकेचे सेव्हन हिल्स रुग्णालय, भायखळा व मुलुंड येथे रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास कंपनीच्या जागेत उभारण्यात आलेले रुग्णालय, दहिसर जम्बो कोविड रुग्णालय, कांजुरमार्ग येथील कोविड उपचार केंद्र आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध रुग्णालयांसह शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

तसेच महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयांमध्ये, ३० हजार ३६४ बेड्स उपलब्ध आहेत. यामध्ये १७ हजार ६९७ ऑक्सिजन बेड्स, ३ हजार ७८८ अतिदक्षता बेड्स, लहान मुलांसाठी १ हजार ४६० बेड्स, लहान मुलांसाठीच्या अतिदक्षता कक्षात २३० बेड्स आणि नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षात कक्षात (NICU) ५३ बेड्सचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -