घरCORONA UPDATECorona Vaccination : खासगी रुग्णालयांत २४ तास लसीकरण!

Corona Vaccination : खासगी रुग्णालयांत २४ तास लसीकरण!

Subscribe

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि दररोज किमान एक लाख लोकांना लस देण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. 

मुंबईमध्ये १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, पालिका व सरकारी रुग्णालयात लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारच्या परवानगीने मुंबईतील जास्तीत जास्त खासगी रुग्णालयात कोरोनावरील लस देण्यात येत आहे. आतापर्यंत ३ लाख ९० लोकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि दररोज किमान एक लाख लोकांना लस देण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी आता खासगी रुग्णालयांत २४ तास लसीकरण सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातील एक प्रस्ताव मुंबई महापालिकेने केंद्र सरकारला पाठवला होता, त्यास केंद्राने मंजुरी दिल्याने वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत कोरोनावरील लसीकरण वाढवण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या आढावा व नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनीही आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, विविध खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी आदींना मार्गदर्शन केले. मुंबईत सध्या ६० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. ९ मार्चपर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील १५ हजार २७२ व्यक्तींना लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

२४ तास लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर दररोज १ लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचा मानस आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ३० लाख असून दिवसाला १ लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास एका महिन्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा आत्मविश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

महापालिका क्षेत्रातील व्यक्तींचे लसीकरण करण्यापूर्वी त्यांची नोंदणी ही संबंधित ‘कोविन अ‍ॅप’ वर होणे गरजेचे आहे. तसेच रुग्णालयांमध्ये जाऊन थेट नोंदणीचा पर्यायही नागरिकांसाठी उपलब्ध आहे. रुग्णालयांच्या स्तरावर संबंधित संकेतस्थळाद्वारे नोंदणी करण्यात अडचणी असल्याची बाब काही खासगी रुग्णालयांद्वारे आजच्या बैठकीदरम्यान मांडण्यात आली. त्यावर आयुक्तांनी, सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी व माहिती तंत्रज्ञान खात्यातील अधिकारी यांचा समावेश असलेली चमू तात्काळ गठीत करण्याचे व सदर चमू ११ मार्चपासून पालिकेच्या ‘१९१६’ या दूरध्वनी क्रमांकाशी संलग्न करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

‘त्या’ रुग्णालयांची मान्यता रद्द होणार

महापालिका क्षेत्रातील ज्या रुग्णालयांना लसीकरण केंद्रे सुरु करण्यास केंद्र शासनाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे, पण ज्यांनी अद्यापही लसीकरण केंद्र सुरु केले नाही, अशा रुग्णालयातील लसीकरण केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -