घरक्राइमDawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमधील रुग्णालयात, विषप्रयोग झाल्याची चर्चा

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमधील रुग्णालयात, विषप्रयोग झाल्याची चर्चा

Subscribe

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानच्या कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सोमवारी सूत्रांनी दिली. त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याची चर्चाही सुरू आहे, मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दाऊद इब्राहिमला रुग्णालयात कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले असून त्याच्या मजल्यावर तो एकमेव रुग्ण आहे. फक्त रुग्णालयातील उच्च अधिकारी, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि त्याच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांना या मजल्यावर प्रवेश दिला जातो, असेही सूत्रांनी सांगितले. सोमवारपर्यंत तो दोन दिवस रुग्णालयात होता. अंडरवर्ल्ड डॉन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची खातरजमा मुंबई पोलीस करत असून ते दाऊदचे नातेवाईक अलीशाह पारकर आणि साजिद वागळे यांच्याकडून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरे लग्न केल्यानंतर दाऊद कराचीमध्ये वास्तव्यास असल्याचे दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) जानेवारीमध्ये सांगितले होते.

- Advertisement -

पाकिस्तानी पत्रकारांनाही संशय

दाऊद इब्राहिमला विष देण्यात आल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याबाबत पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनीही यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यात त्यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांचा उल्लेख केला आहे. काहीतरी मोठी घटना घडली असल्याची शंका व्यक्त करत, पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काम करत नाहीत. यूट्यूब, गुगल आदींचे सर्व्हर डाऊन झाले आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

दाऊद इब्राहिमला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जाते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर हे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. मात्र, याची खातरजमा कोण करणार हा खरा प्रश्न आहे. कारण याबाबत कोणी विचारणा केली तर तोही अडचणीत येईल, असे आरजू काझमी सांगतात. पाकिस्तानमध्ये सर्व सोशल प्लॅटफॉर्म सेवा अचानक ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे या काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय बळावतो. अन्यथा ही बातमी येताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा अचानक डाऊन कशी होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

विविध कारणांची चर्चा

कथित विषप्रयोगामागील विविध कारणांची चर्चा सुरू आहे. त्यात अंतर्गत सत्तासंघर्षापासून भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर बाहेरून येणाऱ्या दबावापर्यंतचे कारण असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर अदनान अहमद उर्फ ​​अबू हंजलासह अनेक वॉन्टेड दहशतवादी पाकिस्तानमध्ये मारले गेले आहेत. भारतामध्ये काहींना हे ‘रॉ’ या गुप्तचर संघटनेने घडवून आणल्याचा संशय आहे. याबाबतचे निवेदन दिले जाईल आणि त्याद्वारे दाऊदचे लोकेशन समोर येईल, असे रॉचा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते.

भारतातील दहशतवादी कारवायांमागे दाऊद

दाऊद अनेक दशकांपासून भारतातून फरार आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा कट रचण्यात आणि ती घडवून आणण्यात त्याच्या कथित सहभागामुळे त्याला भारताकडून मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. तो कराचीतच असल्याचे पुरावे भारताने देऊनही त्याला आम्ही आश्रय दिलेला नाही, अशीच भूमिका पाकिस्तानने वारंवार घेतली आहे. 2008मधील 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्येही त्याचा सहभाग होता. या दहशतवादी हल्ल्यातील 10 पाकिस्तानी अतिरेक्यांना शस्त्रे आणि दारूगोळा पुरवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -