घरमुंबईभिवंडीत मालमत्ताकर वसूलीत पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

भिवंडीत मालमत्ताकर वसूलीत पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Subscribe

निवडणूक कामांची कारणे देत अधिकाऱ्यांनी मालमत्ताकराची वसूली करण्यास दिरंगाई केली आहे. यामुळे पालिका अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

भिवंडी शहर महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील बहुसंख्य नागरिक घरपट्टी, पाणीपट्टीचा मालमत्ता कर वेळेवर भरत नसल्यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. वसूलीचा डिंगोरा पिटणाऱ्या नगरसेवकांच्या मागणीनूसार आयुक्त मनोहर हिरे यांनी दोन वेळा मालमत्ता कर वसूलीसाठी व्याज माफी अभय योजना राबविली. मात्र काही कामचुकार प्रभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे योजनेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने पालिकेस ३१ मार्च अखेर फक्त ३२ कोटी रुपयांची कर वसूली झाली आहे. त्यामुळे महापौर जावेद दळवी या अल्प वसूलीवर तीव्र नाराज झाले असून वसूली कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

कामात टाळाटाळ

महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांनी सुमारे २८९ कोटीहून अधिक मालमत्ता कर थकवला आहे. मालमत्ताकर राजकीय पक्षांच्या काही पुढाऱ्यांसह नगरसेवक, पावरलुम व्यापारी व नागरिक मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने महापालिकेसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पालिकेची अपेक्षित कर वसूली व्हावी यासाठी नगरसेवकांनी महापौर दळवी यांच्याकडे व्याज माफीच्या अभय योजनेची मागणी केली होती. त्याप्रमाणे महापौर दळवी यांनी आयुक्त मनोहर हिरे यांना अभय योजनेची मुदत वाढवण्यास भाग पाडले व मालमत्ता धारकांना कर भरण्याची ३१ मार्चपर्यत अभय योजना जाहीर केली. ६ मार्च २०१९ ते ३१ मार्चपर्यंत मालमत्ता करावरील व्याज माफी देण्याचे निश्चित करण्यात आले होते.मात्र त्यास बहुतांश मालमत्ता कर धारकांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणूकीचा बहाणा करून मालमत्ता कर वसूलीच्या कामात टाळाटाळ केली. त्यामुळे ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत फक्त ३२ कोटीची कर वसूली झाली आहे. वर्षभरात किमान १०० कोटींचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने ठेवले होते मात्र काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे या वर्षात ६२ कोटी ६७ लाख रोख रूपयांची वसूली झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -