घरमुंबईलोकसहभागातून शाळा बनली डिजिटल

लोकसहभागातून शाळा बनली डिजिटल

Subscribe

शाळांमध्ये ई लर्निंग पद्धत सुरू करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले असले तरी ग्रामीण भागातील शाळांना येणार्‍या समस्येकडे फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये ई लर्निंग पद्धत सुरू करण्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक सोमनाथ वाळके यांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून त्यांनी शाळा डिजिटल तर केलीच पण राज्यातील पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओही शाळेत उभारला. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन बीडमधील शिक्षकांनीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकले. आज बीडमधील 100 टक्के शिक्षक तंत्रस्नेही झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारकडून आय.सी.टी. राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आले.

राज्य सरकारच्या आदेशानुसार पारगाव जोगेश्वरी जिल्हा परिषदेच्या शाळेत ई लर्निंग पद्धतीने शिक्षण देण्यासाठी शिक्षक सोमनाथ वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रशासनाकडून संगणक लॅब सुरू करण्यात आली. त्या लॅबमधून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्यास सुरुवात झाली. परंतु विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण देता यावे यासाठी वाळके यांनी लोकसहभागातून शाळेत प्रोजेक्टर आणण्याचा निर्णय घेतला. शाळेत प्रोजेक्टर आणण्याबरोबरच त्यांनी डिजिटल क्लासरुम बनवण्याचा निर्णय घेतला. त्याला शाळा प्रशासनानेही मान्यता दिली. शाळेत संगणक व प्रोजेक्टर येताच वाळके यांनी त्यावर विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकवण्यास सुरुवात केली. तसेच विविध अ‍ॅक्टिव्हिटी व कंटेट त्यांना प्रोजेक्टरवरून दाखवण्यास सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीपेक्षा या शिक्षणात विद्यार्थ्यांना रस वाटू लागला. त्यामुळे विद्यार्थ्यी आपोआप शाळेत येऊ लागले. यामुळे शाळेची उपस्थिती वाढून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही झाला.

- Advertisement -

विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढत असल्याचे पाहून वाळके यांनी शाळेमध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा स्टुडिओ सुरू केल्यानंतर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे आवाज चांगले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण त्यांना गायनाची संधी मिळत नव्हती. यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्यास सुरुवात केली. उत्तम गाणार्‍या विद्यार्थ्यांकडून त्यांनी पाठ्यपुस्तकातून कवितांचे रेकॉर्डिंग करून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली. या कविता नुसत्याच रेकॉर्डिंग न करता त्यांनी सॉफ्टवेअरमधील चाळींचा वापरही केला. त्यामुळे त्या कविता अधिक आकर्षक झाल्या. यापुढे जात वाळके यांनी लोकसहभागातूनच ढोल, ड्रम, गिटार, तबला अशी वाद्ये आणली. पण हे सर्व करण्यासाठी सरकारकडून त्यांनी कोणत्याही मदतीची अपेक्षा केली नाही. शालेय शिक्षण डिजिटल बनवण्यासाठी एकामागोमाग एक उपक्रम राबवण्यात यशस्वी होत असतानाच वाळके यांच्यासमोर एक संकट उभे राहिले.
एके दिवशी स्टुडिओमधील सर्व सामानाची चोरी झाली. स्टुडिओमध्ये झालेल्या चोरीमुळे निराश झालेल्या वाळके यांनी ‘एक स्वप्नाचे घर भस्मसात’ असा लेख लिहून तो फेसबुकवर पोस्ट केला. त्यामध्ये त्यांनी कशापद्धतीने स्टुडिओ उभारण्यात आला व तो कसा उद्ध्वस्त झाला याची माहिती दिली.

मात्र येथे पुन्हा लोकसहभाग वाळके यांच्या मदतीला धावून आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या दत्ता बाळसराफ व संत काळपांडे यांनी ही पोस्ट वाचली. दुसर्‍या दिवशी त्यांनी लगेचच त्यांना फोन करून आम्हाला सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या शाळेला मदत करायची आहे असे सांगत 72 हजार निधी देत अत्याधुनिक स्टुडियो उभारला. यामुळे पारगाव जोगेश्वरी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ही राज्यामध्ये अत्याधुनिक स्टुडिओ उभारणारी पहिली शाळा ठरली. पुन्हा नव्याने स्टुडिओ उभारल्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत टॅब आणण्यासाठी शाळेला १ लाख रुपये दिले. टॅबमुळे मुलांच्या दफ्तराचे ओझे कमी झाले. मुले टॅबवर घरी व शाळेत अभ्यासाबरोबरच ज्ञान मिळवण्याची अनेक प्रोजेक्ट करू लागले. याचबरोबरच शाळेला कोल्हापूरच्या प्रेसिजन फाऊंडेशन व एक्सर फाऊंडेशनने अडीच लाखांचे ‘ई लर्निंग किट’ दिले. यामुळे शाळा हायटेक होण्यास मदत झाली. तसेच त्यांनी दिलेल्या सोलर प्रकल्पामुळे शाळा झिरो एनर्जी स्कूल झाली आहे.

- Advertisement -

लोकसहभागातून मिळालेल्या सहकार्यामुळे पहिली ते सातवीमधील 200 मुलांना मुंबई, पुण्याप्रमाणे सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्याशिवाय, तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रोजेक्टर, टॅब्लेट, स्मार्टबोर्ड, सोलर सिस्टीम, इन्व्हर्टर, अँड्रॉइड टीव्ही, व्हीआर बॉक्स, थ्रीडी क्लासरूम आदी बाबीही त्यांनी लोकसहभागातून उभ्या केल्या. शाळेतील विद्यार्थी विविध शैक्षणिक व्हिडिओ, पीपीटी, शैक्षणिक सॉफ्टवेअर, अभ्यासक्रम प्रोजेक्टरवर पाहून शिकत आहेत. इंटरअ‍ॅक्टिव्ह स्मार्टबोर्डच्या मदतीने विविध शैक्षणिक कृती करत आनंददायी शिक्षण घेत आहेत. अशा प्रकारची बीड जिल्ह्यातील पहिली हायटेक शाळा तयार करण्यात वाळके यांचा मोलाचा वाटा आहे.

ई लर्निंगचा ध्यास घेतलेले तंत्रस्नेही सोमनाथ वाळके यांनी फक्त आपली शाळा डिजिटल करून थांबले नाहीत. त्यांनी राज्यातील अन्य शाळांमधील शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणार्‍या ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमामध्ये स्टॉल लावून शाळेमध्ये राबवलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. ‘शिक्षणाची वारी’ हा उपक्रमांतर्गत वाळके यांनी पुणे, लातुर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक व रत्नागिरी येथे स्टॉल लावले आहेत. यामुळे आतापर्यंत राज्यातील तब्बल 100 पेक्षा अधिक शाळांच्या शिक्षकांनी पारगाव-जोगेश्वरी शाळेला भेटी दिल्या असल्याची माहिती वाळके यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील शिक्षकांना तंत्रस्नेही बनवण्यासाठी ते कार्यशाळा घेत आहेत. त्याअंतर्गत त्यांनी शिक्षकांना प्रोत्साहित करण्याचे काम करत त्यांना विविध सॉफ्टवेअर कसे वापरायचे, त्याचे फायदे काय, व्हिडिओ कसे बनवायचे, मोबाईल कसा हाताळायचा याचे ज्ञान दिले. त्यामुळे जिल्ह्यातील 100 टक्के शिक्षक हे तंत्रस्नेही झाले आहेत. 70 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत, असे सोमनाथ वाळके अभिमानाने सांगतात.

तंत्रज्ञान नेहमीच बदलत असते. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान सतत शिकत राहणे व ते विद्यार्थ्यांना शिकवत राहणे हे माझे ध्येय आहे.
– सोमनाथ वाळके, आयसीटी पुरस्कार विजेते शिक्षक

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -