घरमुंबईमंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न, २ दिव्यांग शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न, २ दिव्यांग शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून दोन दिव्यांग शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन दिव्यांग शिक्षकांनी मधल्या जागेत बसवलेल्या जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. दिव्यांग शाळांसाठी अनुदानाची मागणी करण्यासाठी ते मंत्रालयात आले होते. मात्र, तिथे मिळणाऱ्या प्रतिसादामुळे व्यथित होऊन या दोघांनी थेट दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. दरम्यान, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. हेमंत पाटील आणि अरुण नटोरे अशी या दोघांची नावं आहे. दरम्यान, मंत्रालयाच्या मधल्या भागात सुरक्षेसाठी जाळी बसवण्यात आल्यामुळे या दोघांचे प्राण वाचले आहेत. याआधीही अशा प्रकारे मंत्रालयात आत्महत्या करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या मधल्या भागात सुरक्षेसाठी जाळी बसवण्यात आली आहे.

- Advertisement -

दिव्यांग विद्यार्थी शाळांसाठी अनुदानाची मागणी

राज्यात सध्या सुमारे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ३०० हून जास्त शाळा विनाअनुदानित आहेत. या शाळांना अनुदान देण्याची मागणी घेऊन हे शिक्षक मंत्रालयात आले होते. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. म्हणून निराश झालेल्या दोघा शिक्षकांनी सरकारविरोधात घोषणा देत थेट दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

राज्य सरकारच्या धोरणामुळे प्रस्ताव अडकले

दिव्यांग विद्यार्थी शाळांसाठीच्या कायम विनाअनुदानित शाळा धोरणातला ‘कायम’ हा शब्द काढून अशा शाळांना अनुदान सुरू करावे, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. मात्र, अनेकदा मागणी करून देखील ती मान्य होत नसल्याने अखेर या शिक्षकांनी मंत्रालय गाठलं. दरम्यान, ‘सध्या कोणत्याही आश्रमशाळेला अनुदान मान्यता देण्यात आलेली नाही. केंद्र सरकारच्या २० टक्के अनुदानासाठी १६५ शिक्षण संस्थांची निवड करण्यात आली असली, तरी यासंदर्भात राज्य सरकारचं धोरण अद्याप तयार झालं नसल्यामुळे हे प्रस्ताव थांबले आहेत’, अशी माहिती सामाजिक न्याय विभागातून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -