घरमुंबईडॉक्टरांच्या राजीनाम्यांवर पालिकेचा इलाज

डॉक्टरांच्या राजीनाम्यांवर पालिकेचा इलाज

Subscribe

मनपा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भरती

निलंबित डॉक्टरांच्या समर्थनार्थ मनपाच्या मुख्य डॉक्टरांनी अचानक मनपा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या विरोधात कठोर भूमिका घेत थेट अतिरिक्त आयुक्तांकडे राजीनामे सादर केल्याने गेल्या अनेक दिवसांपसून मनपा रुग्णालय ओस पडले आहे. यात रुग्णांचे हाल होऊ लागल्याने रजेवर गेलेल्या डॉक्टरांची मनधरणी करण्याऐवजी आता नव्याने डॉक्टर भरती करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 58 डॉक्टरांची भरती करण्यात येणार असून, त्यानंतर सोयीनुसार दर शुक्रवारी डॉक्टर भरतीची प्रक्रिया पार पडणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी सांगितले. ढासळलेली आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

विकी इंगळे मृत्यू प्रकरणानंतर झालेल्या कारवाईविरोधात डॉक्टरांनी राजीनामे दिले होते. त्यावेळी निलंबित डॉक्टर आणि विभागीय चौकशी लावण्यात आलेल्या डॉक्टरांच्या समर्थनार्थ इतर डॉक्टरांनीही आंदोलनाच्या मैदानात उडी मारली आणि गरिबांचे रुग्णालय ओस पडले. निर्णय घेणारा डॉक्टरच नसल्याने बहुतांश रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.त्यामुळे अतिदक्षता विभाग, ई वॉर्ड, महिला वैद्यकशास्त्र वार्ड, पुरुष वैद्यकशास्त्र वार्ड ओस पडले आहेत. डॉक्टरांनी राजीनामे देऊन अनेक दिवस उलटले तरी ते कामावर हजर न झाल्याने रुग्णांचे हाल झाले होते.

- Advertisement -

वैद्यकशास्त्र तज्ज्ञ डॉ.सचिन गंगावणे, डॉ. देविदास चव्हाण, डॉ.प्रमोद चव्हाण व डॉ.गीतांजली तगडू यांनी राजीनामे सादर केले असता त्यातील डॉ.देविदास चव्हाण, डॉ.प्रमोद चव्हाण हे सोमवारपासून कामावर हजर होतील, असे अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी सांगितले. इतर डॉक्टरही लवकरच हजर होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनपा रुग्णालयात कार्यरत असणार्‍या 350 परिचारिकांच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या मागण्यांची पूर्तता प्रशासनाकडून करण्यात येत नसल्याने त्यांनीही सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. तसे झाल्यास संपूर्ण रुग्णालयाचा कारभार बंद पडण्याची भीती आहे. असे होऊ नये, यासाठी पालिका आयुक्तांनी आता तात्पुरत्या स्वरूपातील पदे थेट मुलाखती द्वारे भरून डॉक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही पदे भरणार
वैद्यकशास्त्र तज्ज्ञांची पदे 18 आहेत. रोगतज्ज्ञांची 26 पदे, शल्य चिकित्सक तज्ज्ञांची 14 पदे आणि बधिरीकरण तज्ज्ञांची 10 पदे भरावयाची आहेत. त्यांना सहा महिन्यांसाठी करार पद्धतीने नेमून त्यांना मासिक 75 हजार रुपये ठोक मानधन दिले जाणार आहे. यासाठी शुक्रवारपासून थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पालिकेच्या बेलापूर येथील मुख्यालयात या मुलाखती पार पडणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -