घरमुंबईDongri Bulding Collapse : दुर्घटनास्थळी नेत्यांची लटांबरं हवीत कशाला?

Dongri Bulding Collapse : दुर्घटनास्थळी नेत्यांची लटांबरं हवीत कशाला?

Subscribe

डोंगरीमध्ये ४ मजली इमारत कोसळल्यानंतर बचाव पथकांप्रमाणेच अगदी 'तत्परतेनं' राजकीय मंडली तिथं दाखल झाली. बचाव कार्यात त्यांनी किती मदत केली हे अद्याप कळू शकलेलं नसलं, तरी घटनास्थळावरची गर्दी आणि बचाव पथकांवरचा ताण मात्र त्यांनी नक्कीच वाढवल्याचं दिसून आलं.

मंगळवारची सकाळ मुंबईकरांसाठी पुन्हा एक दुर्घटना घेऊन आली. गेल्या महिन्याभरात मालाड-अंधेरीची भिंत, नाल्यात पडलेला दिव्यांश, वरळी सी-लिंकचा कोस्टल रोडसाठीचा खड्डा या अशा दुर्घटनांनी मुंबईकरांमध्ये पावसाविषयी प्रेम निर्माण होण्याऐवजी भितीच उत्पन्न केली होती. त्यातच मंगळवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी डोंगरीतल्या बाबा गल्लीतली केसरबाई ही ४ मजली इमारत कोसळली. अनेकांचे संसार त्यात उद्ध्वस्त झाले. अनेकांना जीव गमवावे लागले. आपलं सर्वस्व गमावलेल्या या लोकांना आता सरकारी मदतीची प्रतिक्षा लागली आहे. ही इमारत अधिकृत होती की अनधिकृत? सरकारी होती की म्हाडाची? परवानगी दिली कुणी? पालिका इतके दिवस झोपली होती का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यांची उत्तरं देखील शोधली जात आहेत. पण या सगळ्या गोंधळात एक प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला आहे.

दुर्घटना घडली ती बाबा गल्ली आणि केसरबाई इमारत असलेला परिसर अतिशय चिंचोळा आहे. त्यामुळे दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर देखील अग्निशमन विभागाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागला. त्यातच स्थानिकांनी देखील गर्दी केली होती. त्यात आसपासच्या इमारती देखील रिकाम्या केल्यामुळे तीही माणसं याच भागात जमा झाली होती. त्यामुळे बचावकार्य करणारे पोलीस, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांसमोर दोन आव्हानं होती. एक म्हणजे मलब्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढणं आणि दुसरं म्हणजे जमा झालेली गर्दी कमी करणं, जेणेकरून त्या अरूंद भागांमध्ये देखील लवकरात लवकर बचाव कार्य करता येईल. पण हे कमी म्हणून की काय, घटनेची माहिती मिळताच राजकीय पक्षाचे ‘बडे’ नेते तिथं येऊन धडकले!

- Advertisement -

डोंगरी दुर्घटना: अग्निशमन दलाने महिलेला सुरक्षित बाहेर काढले

डोंगरी दुर्घटना: अग्निशमन दलाने महिलेला सुरक्षित बाहेर काढले

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜುಲೈ 16, 2019

राजकीय लवाजम्याचं बचाव कार्यात काय काम?

एरवी मोकळ्या परिसरात काही घडलं आणि तिथे राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या, तर ते योग्यही ठरलं असतं. पण आधीच इतकी अरुंद जागा, जमा झालेले स्थानिक आणि त्यांना आवरणं जिकिरीचं होऊन बसलेले बचावपथक हे सगळं दिसत असतानाही ही राजकीय मंडळी भेट देण्यासाठी स्पॉटवर येऊन थडकली. यामध्ये जसे सत्ताधारी पक्षाचे गिरीष महाजन होते, तसेच विरोधी पक्षांचे धनंजय मुंडे, सचिन अहिर, विजय वडेट्टीवार, मिलिंद देवरा, भाई जगताप, वारीस पठाण, अबू आजमी ही मंडळी देखील होती. पाहायला गेलं तर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील आणि महापौर म्हणून विश्वनाथ महाडेश्वर या तिघांनीच तिथे जाणं अपेक्षित होतं. पण जिथे मुख्यमंत्र्यांनीच तिथे जाणं टाळलं असताना बाकीची मंडळी मात्र घटनास्थळावर जाऊन आली. त्यांनी जाऊन बचावकार्यात किती मदत केली? हा जरी अनाकलनीय आणि अनुत्तरीत प्रश्न असला, तरी त्यांची उपस्थिती अनेकांना खटकली. इतक्या गर्दीत, गोंधळात, अडचणीच्या ठिकाणी आपल्या लवाजम्यासह जाऊन या सगळ्यांनी काय बरं साधलं असेल?

- Advertisement -

स्पॉटवर जाऊन राजकीय कमेंटबाजी!

घटनेची माहिती मिळताच ‘तत्परतेनं’ स्पॉटवर पोहोचलेल्या विरोधकांनी त्या गर्दीत सरकारवर किंवा सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे बाईट देण्याव्यतिरिक्त काहीही साधलं नाही. बचावपथकं त्यांचं काम झोकून देऊन करत होते. स्थानिक अतिउत्साहाने त्यांना मदत करत होते. त्यामुळे त्यांना ‘मार्गदर्शन’ करण्यासाठी कुणाचीही गरज नव्हती. शिवाय विरोधत इतक्या संख्येनं दाखल झाले, म्हटल्यावर सत्ताधाऱ्यांनी देखील कंबर कसली आणि घटनास्थळावर पटापट हजेरी लावली. त्यामुळे आम्ही कशी लोकांची काळजी घेतो, हे दाखवण्याचा प्रयत्न जिथे सत्ताधाऱ्यांचा दिसत होता, तिथे सरकार कसं लोकांना वाऱ्यावर सोडून राजकारण करत आहे, हे दाखवण्यात विरोधक व्यस्त होते. पण लोकांना वाचवण्याचं मुख्य काम करत होती बचाव पथकं!

‘सत्ताधारी मंत्र्यांनी आपल्या लोकांसह इतक्या गर्दीत इथे येऊन बचावकार्यात अडथळाच निर्माण केला’, असं जरी विजय वडेट्टीवारांनी म्हटलं असलं, तरी ते देखील आपल्या लोकांसह तिथे जाऊन पोहोचले होतेच. या सगळ्यांनी स्पॉटवर न जाता बाहेरून परिस्थितीवर लक्ष ठेवलं असतं आणि सरकारवरची टीका किंवा विरोधकांसमोरचा बचाव केला असता, तर कदाचित बचावकार्य करणाऱ्या पथकांवर यांच्यामुळे होणारी गर्दी पांगवण्याचा अतिरिक्त ताण पडला नसता!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -