घरमुंबईदेशातील औषध नियंत्रक अधिकारी सुरक्षित नाहीत?

देशातील औषध नियंत्रक अधिकारी सुरक्षित नाहीत?

Subscribe

मोहालीमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या महिला अधिकाऱ्याची हत्या झाल्यानंतर देशातील सर्व राज्यातील औषध आणि अन्न प्रशासनाने काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला आहे.

पंजाबमधील औषध नियंत्रक अधिकारी नेहा शौरी यांची हत्या झाल्यानंतर देशभरातील औषध नियंत्रकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी मोहालीमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या महिला अधिकाऱ्याची हत्या झाली. या महिला अधिकाऱ्याच्या हत्येचा देशभरात निषेध नोंदवला जात आहे. देशाच्या सर्व राज्यातील औषध आणि अन्न प्रशासनाने काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला आहे. औषध नियंत्रक नेहा शौरी यांनी औषध विक्रेत्याचा परवाना रद्द केल्याने ही हत्या करण्यात आली असल्याचे समजत आहे. मात्र, यामुळे राज्यातील औषध नियंत्रक अधिकारी दहशतीखाली आले असून त्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला. दरम्यान औषध नियंत्रकांच्या सुरक्षेसाठी सरकारलाच साकडे घालणार असल्याची माहिती ऑल इंडिया कंट्रोल ऑफिसर्स कॉन्फेडरेशनचे संचालक एस. डब्ल्यू. देशपांडे यांनी दिली.

‘औषध नियंत्रक अधिकारी सुरक्षित नाहीत’

ऑल इंडिया कंट्रोल ऑफिसर्स कॉन्फेडरेशननं म्हटलं आहे की, “ पंजाबप्रमाणे देशातील प्रत्येक राज्यात अशीच परिस्थिती आहे, औषध नियंत्रक अधिकारी सुरक्षित नाहीत. औषध नियंत्रक अधिकाऱ्यांना औषध माफिया, गुन्हेगारांवर छापेमारी करावी लागते, त्यांची चौकशी करावी लागते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये पुरेसं मनुष्यबळ आणि साधनसामुग्री उपलब्ध नाही. औषध व्यापारात अवैध औषधं, बेकायदेशीर व्यापार आणि मादक पदार्थांची विक्री वाढत आहे. अशा प्रकरणांवर नियंत्रण ठेवणं हे औषध नियंत्रक विभागासाठी खूप आव्हानात्मक आहे. ”

- Advertisement -

सरकारने योग्य पावलं उचलण्याची मागणी

“औषध नियंत्रक विभागात महिला अधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत. सध्याच्या घडीला देशभरात ३० टक्के औषध नियंत्रक अधिकारी या महिला आहेत. त्यामुळे सर्व औषध नियंत्रक अधिकाऱ्यांना सुरक्षित कामाचं वातावरण देण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवीत. अशा अनपेक्षित घटनांचा सामना करण्यासाठी औषध नियंत्रक विभागाला तातडीनं आवश्यक ती साधनं द्यावीत” अशी मागणी ऑल इंडिया कंट्रोल ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने केंद्र आणि राज्य सरकारला पत्र पाठवून केली आहे. औषध नियंत्रक अधिकाऱ्यांना औषध माफियांवर कारवाई करून त्यांची चौकशी करावी लागत असते. अशा वेळी प्रत्येक राज्यातील उपलब्ध मनुष्यबळ पुरेसे नसल्याचे या पत्रात नमूद केले आहे. अवैध औषधांच्या तक्रारी आणि त्यातून निर्माण होणारा बेकायदेशीर विक्रीच्या तक्रारी सतत येत आहेत. यावर कारवाई करणे औषध नियंत्रक विभागासाठी आव्हानात्मक होत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

औषध नियंत्रक अधिकारी नेहा शौरी यांची २९ मार्च २०१९ रोजी हत्या झाली. नेहा या पंजाब राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, २००९ साली छापेमारीत त्यांनी एका औषध दुकानाचा परवाना रद्द केला होता. याच औषध दुकानाच्या मालकाने नेहा यांची हत्या केली. बलविंदर सिंग असं या आरोपीचं नाव आहे. नेहा शौरी या मोहालीत आपल्या कार्यालयात होत्या. त्यावेळी बलविंदर त्यांच्या कार्यालयात आला आणि त्यानं नेहा यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावानं पकडल्यानं बलविंदर यांनी स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. दरम्यान या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून होते आहे. या घटनेचा निषेध म्हणून अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकारी दोन दिवस काळ्या फिती लावून काम करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -