घरमुंबईनवरात्रोत्सवाला अंमलीपदार्थांचा विळखा

नवरात्रोत्सवाला अंमलीपदार्थांचा विळखा

Subscribe

अंमलपदार्थ विरोधी पथकाच्या कारवायांना वेग

मुंबई:-सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. मुंबईत ठिकठिकाणी रासगरब्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याकरता तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. मुंबईत साजरा होणार्‍या हायप्रोफाईल दांडिया-रासगरब्यात अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक अंधेरी, घाटकोपर, नागपाडा या परिसरात कारवाया करत आहे. पथकाच्या दोन वेगवेगळ्या युनिटने अंधेरी येथून एका नायजेरीयन तरुणाला अटक करून त्याच्याकडून जवळपास २० लाखांचे अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. नवरात्रोत्सव सुरु झाल्यापासून पोलिसांच्या या कारवाईला जोर आला आहे.

नवरात्रोत्सवाच्या दरम्यान कोेकेन आणि ईफेड्रीन हे दोन प्रकारचे ड्रग्स मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. हे ड्रग्स येतात कुठून, त्यांचा पुरवठादार कोण आहे. याबद्दल पोलिसांना ठोस माहिती उपलब्ध नाही. अंमली पदार्थावरील कारवाईमध्ये फक्त ज्याच्याकडे ड्रग्स सापडतात त्यालाच अटक केली जाते, पुढे या तपासाला पूर्णविराम मिळतो. कोकेन आणि ईफेड्रीन हे दोन प्रकराचे ड्रग्स बरेच महागडे आहेत. लाखो रुपयांत हे ड्रग्ज विकले जातात. पार्ट्या, उत्सवादरम्यान हे ड्रग्स विकत घेवून नशा केली जाते. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख शिवदिप लांडे यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स पेडलर्स विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे.

- Advertisement -

मुंबईतील ड्रग्स तस्करीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न लांडे यांचा आहे. मात्र वारंवार कारवाया करूनही तपासात पुढील गती का मिळत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.हायप्रोफाईल परिसरात नवरात्रोत्सवादरम्यान अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात. त्यासाठी प्रत्येक विभागात फिरुन त्या परिसराची रेकी केली जाते. गर्भश्रीमंत परिसरातील बड्या घरातील मुलांना यासाठी शिकार बनवले जाते. अंमली पदार्थांची किंमत ही महागडी असल्याने हा खटटोप केला जातो. श्रीमंत घरातील मुलांना एजंटाकरवी हे ड्रग्स पुरवले जातात. यामध्ये प्रामुख्याने अंधेरीतील आंबोली परिसर कायम असतो. या परिसरात दर १५ ते २० दिवसांमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक वारंवार कारवाया करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. दरम्यान या पदार्थांची किंमत ही जवळपास १० ते १५ हजारांपेक्षा जास्त असते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एकाच दिवशी २० लाखांचे ड्रग्स जप्त

मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या दोन वेगवेगळ्या युनिटने केलेल्या कारवाईमध्ये जवळपास २० लाखांचे अंमलीपदार्थ जप्त केलेले आहेत. यामध्ये सर्वांत महागडे असणारे कोेकेन आणि ईफेड्रीन या दोन अंमली पदार्थांचा समावेश आहे. १२ लाख ५० हजार रुपयांचे १२५ ग्रॅम कोकेन एका नायजेरीयन तरुणाकडून अंधेरीतील आंबोली परिसरातून जप्त करण्यात आले. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जॉन केन्डी असे या नायजेरीयन तरुणाचे नाव असून नवरात्रीच्या उत्सवात हे अंमली पदार्थ विकण्याचा त्याचा इरादा होता, मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईत ड्रग्सच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तर घाटकोपर अंमली पदार्थच्या पथकाने नागपाडा परिसरात ईफेड्रीन नावाचे २ किलो वजनाचे ड्रग्स एका तरुणाकडून जप्त केले आहे. सुमारे ३ लाख रुपये इतकी या ड्रग्सची किंमत आहे. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव ईरफान शेख असे आहे.

- Advertisement -

‘शायना’ही ताफ्यात जमा

मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकात तब्बल २४ वर्षांनंतर एक नवी श्वान दाखल झाले आहे. ‘शायना’ असे या श्वानाचे नाव आहे. १४ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण या शायनाला देण्यात आले आहे. त्यामुळे या नव्या फॉर्म्युल्यामुळे अंमली पदार्थ विकणार्‍या सप्लायर्सना चाप बसणार असल्याचे अधिकार्‍यानी सांगितले.

मुंबईत विकले जाणारे अंमली पदार्थांचे सर्व प्रकारचे रॅकेट उद्धवस्थ करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक नेहमीच काम करते. तशा प्रकारच्या कारवाया आतापर्यंत करण्यात आलेल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशी सुरु आहे. नवरात्रौत्सवात ड्रग्स विकणार्‍या एजंटांच्या मुसक्या आवळण्यासाठी आम्ही सक्षम असून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– शिवदिप लांडे, आयपीएस अधिकारी, अंमलीपदार्थ विरोधी पथक प्रमुख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -