घरमुंबईकरोनामुळे कोकणातील वेळास,आंजर्ले कासव महोत्सवाला स्थगिती

करोनामुळे कोकणातील वेळास,आंजर्ले कासव महोत्सवाला स्थगिती

Subscribe

पर्यटकांसह छायाचित्रकारांमध्ये नाराजी

जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशात आणि महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण आढळल्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वेळास आणि आंजर्ले किनार्‍यावर प्रत्येक वर्षी होणार्‍या प्रसिद्ध कासव महोत्सवाला स्थगिती देण्यात आली आहे. महोत्सवाला होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेळास ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र वनविभाग, कासव मित्र मंडळासह वन विभाग महाराष्ट्र शासन, मँग्रोव्ह सेल, सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण आणि कासव मित्र आंजर्ले या संस्थांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पर्यटकांसह हौशी छायांचित्रकारांमध्ये नाराजी आहे.

आंजर्ले येथील कासव मित्रमंडळ संस्था, चिपळून येथील सह्याद्री निसर्ग मित्र व दापोली वन विभाग यांच्यावतीने यंदा १४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान आंजर्ले कासव महोत्सव तर वेळास ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र वनविभाग, कासव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ मार्च ते २८ मार्च २०२० दरम्यान वेळास कासव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र वन विभाग, कासव मित्र मंडळ, वेळास आणि वेळास ग्रामपंचायत यांच्यात कोरोना विषयाबाबत झालेल्या बैठकीत घेतलेल्या ठरावांतर्गत या कासव महोत्सवाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.संपूर्ण राज्यात करोना या दहशत माजवणार्‍या व्हायरसचा वाढणारा प्रादुर्भाव आणि त्याबाबतची खबरदारी लक्षात घेता हा निर्णय या कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत घेण्यात आला आहे. हा महोत्सव २००६ पासून सुरू असून यंदा १५ वे वर्ष आहे.

- Advertisement -

या महोत्सवादरम्यान अंड्यातून बाहेर पडणार्‍या कासवांच्या नवजात पिलांना समुद्रातील पाण्यात सोडण्यात येते. ही नवजात पिल्ले समुद्रात मार्गस्थ होताना पाहण्याचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणांहून पर्यटक वेळास,आंजर्लेला हजेरी लावत असतात. त्यामुळे या महोत्सवात हमखास गर्दी होते. मात्र, कोरोनो व्हायरसच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता ही गर्दी टाळण्यासाठी यंदाचा कासव महोत्सव स्थगित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र वन विभाग, कासव मित्र मंडळ, वेळास आणि वेळास ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या या कासव महोत्सवाचे यंदा १५ वे वर्ष होते. या महोत्सवाला साधारण महाराष्ट्रातील विविध भागातून पाच ते सात हजार पर्यटक आवर्जून भेट देतात. जास्तीत जास्त पर्यटक, कासव प्रेमींचा ओघ हा मुंबई, पुण्यातून दरवर्षी असतो. मात्र कोरोना व्हायरसच्या संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यंदाचा महोत्सव ग्रामसभेत झालेल्या ठरावावरून तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. – प्रल्हाद तोडणकर, वेळास संरपंच

- Advertisement -

वेळास या छोट्या गावाच्या समुद्र किनार्‍यावर निसर्गाचा अद्भूत खेळ म्हणजे हा महोत्सव असतो. कासवाची पिले अंड्यातून बाहेर पडताना पाहणे आनंदाचे असते. समुद्राच्या किनार्‍यावर फार कमी जागा अशा आहेत. जिथे कासवाची मादी अंडी घालते. हा नैसर्गिक सोहळा बघण्यासाठी आणि तो कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी आम्ही काही हौशी छायाचित्रकार वेळासला जाणार होतो. मात्र कोरोनामुळे वेळास कासव महोत्सव रद्द करण्यात आला. त्यामुळे पर्यटनाच्या आणि आमच्यासारख्या हौशी छायाचित्रकारांमध्ये निराशा आहे. – संजय अमृतकर, पर्यटक, छायाचित्रकार

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -