घरमुंबईनवी मुंबईत पर्यावरणपूरक ‘ई बाईक’ धावण्यास सुरुवात

नवी मुंबईत पर्यावरणपूरक ‘ई बाईक’ धावण्यास सुरुवात

Subscribe

प्रदूषण रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल

वाहतुकीसाठी ‘जनसायकल’ योजना आणल्यानंतर आता पालिका प्रशासनाने बंगळूरु शहराच्या धर्तीवर नवी मुंबईत भाडेतत्त्वावर पर्यावरणपूक ‘ई बाईक’ ही दुसरी महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. ‘युलू’ सायकलप्रमाणेच अ‍ॅपवर ती भाड्याने घेता येणार असून, पहिल्या दहा मिनिटांसाठी 20 रुपये आकारले जाणार आहेत. 18 वर्षांखालील मुलांना याचा वापर करता येणार नाही. गुरुवारपासून या योजनेला सुरुवात होणार असून, प्रथम नेरुळ व सीवूड्स परिसरातच त्या ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी शहरातील आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. महत्त्वाची अट म्हणजे त्या 18 वर्षांखालील मुलांना चालविता येणार नाहीत. असे कोणी आढळल्यास 10 हजारांचा दंड आकारला जाणार आहे. ज्या वापरकर्त्यांच्या अ‍ॅपवर ती चालवली जाईल त्याला अ‍ॅपमधून ‘ब्लॉक’ केले जाणार आहे.

‘युलू’ सायकल प्रणालीला नवी मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा विस्तारही करण्यात आला असून, आता कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यान तसेच ऐरोली सेक्टर 15 येथील ‘जॉगिंग ट्रॅक’ येथेही सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. आता याच धर्तीवर ‘ई बाईक’ ही योजना पालिकेने आणली आहे. सध्या देशात फक्त बंगळूरु शहरात हा प्रयोग सुरू असून, त्यानंतर नवी मुंबईत होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात तरुणाईकडून दुचाकी वाहनांचा वापर करण्यात येत आहे. मात्र यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. ‘ई बाईक’मुळे प्रदूषणालाही आळा बसणार आहे. या बाईकचा वेग प्रतितासाला 25 किलोमीटर असणार आहे. त्यामुळे ही दुचाकी भरधाव चालविता येणार नाहीत. पेट्रोलचा वापर होणार नाही. कारण या दुचाकी चार्जिंगवर चालणार आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर 50 ते 55 किलोमीटर एवढे अंतर त्या कापू शकतील. नेरुळ, सीवूड रेल्वेस्थानक, एनआरआय कॉम्प्लेक्स, पामबीच डॉमिनोज नेरुळ, करावेनगर बसस्थानक, ईस्टर्न गॅलरी, ज्वेल ऑफ नवी मुंबई, महापालिका मुख्यालय या ठिकाणी ती उपलब्ध असणार आहे. चोरीला जाऊ नये यासाठी सायकल व बाईकला जीपाएस लावले आहे. कोठे गाडी जात आहे याची संपूर्ण माहिती संबंधित कंपनीला मिळते. त्यामुळे तत्काळ याचा शोध लागतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -