घरमुंबईजलद प्रवास आणि मुंबई महानगराचा विस्तार

जलद प्रवास आणि मुंबई महानगराचा विस्तार

Subscribe

मुंबई महानगराच्या विकासामध्ये वाहतुकीच्या सुविधांवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून(एमएमआरडीए) अधिक भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचे काम असो किंवा मुंबई शहराअंतर्गत रस्ते वाहतुकीचे प्रकल्प असो, मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याचे उद्दिष्ट प्राधिकरणाने ठेवले आहे. ‘परवडणार्‍या दरातला सुरक्षित अशा स्वरूपाचा प्रवास’ हा संकल्प एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी आगामी वर्षासाठी केला आहे. दै.‘आपलं महानगर’चे प्रतिनिधी किरण कारंडे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.

मुंबईकरांचा प्रवास येत्या वर्षात कसा जलद होणार आहे ?
नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेऊन त्यांची युद्धपातळीवर अंमलबजावणी करणे यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण आगामी वर्षातही सक्रीयपणे काही प्रकल्प मुंबईकरांसाठी राबविणार आहे. दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो २ अ प्रकल्पाअंतर्गत १८.५ किमी अंतराची मार्गिका तसेच अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व अशा मेट्रो ७ मार्गिकेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या दोन्ही मार्गिकेचे स्थापत्य स्वरूपाचे काम २०१९ मध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी या वर्षात सुरू करण्याच्या उद्दिष्टानेच मुंबई मेट्रो संचालन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मेट्रोसोबतच मोनोरेल प्रकल्पाच्या संचालन आणि व्यवस्थापनाला एमएमआरडीएमार्फत गती देण्यात येणार आहे.

- Advertisement -

डी. एन. नगर ते मानखुर्द या २३.५ किमी लांबीच्या मेट्रो २ ब मार्गिकेचे तसेच वडाळा – घाटकोपर – मुलुंड – ठाणे – कासारवडवली या ३२ किमी लांबीच्या मेट्रो ७ मार्गिकेचे काम प्राधिकरणाने सुरू केले आहे. मेट्रो ६ च्या कामाअंतर्गत स्वामी समर्थ नगर – जोगेश्वरी – कांजुरमार्ग – – विक्रोळी या मार्गिकेचे कामही सुरू करण्यात आले आहे. गायमुख ते शिवाजी चौक (मिरा रोड) मेट्रो मार्गिका १० आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्गिका ११ तसेच कल्याण-तळोजा मेट्रो १२ या तीन मार्गिकांनाही प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. हे तिन्ही प्रकल्प शासन मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहेत.

प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वॉर रूम

रस्ते वाहतूक कशी सुकर होईल ?
हार्बर-मध्य-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) तीन नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी २०१९ वर्षात होणार आहे. मुंबईकरांची कनेक्टिव्हिटी सुकर करतानाच प्रदूषण कमी करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होईल. या तिन्ही प्रकल्पांसाठी मिळून एमएमआरडीए ७५० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. वाहतूक कोंडीतून सुटका होतानाच प्रवाशांचा वेळही वाचण्यासाठी या प्रकल्पांच्या माध्यमातून मदत होईल. वांद्रे-कुर्ला-चुनाभट्टी रस्त्यासाठी प्राधिकरणाकडून १६३ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यामुळे वाहनचालकांना वांद्रे-कुर्ला-चुनाभट्टी दरम्यानचे ३ किलोमीटरचे अंतर कमी होण्यासाठी मदत होईल. वांद्रे-कुर्ला जंक्शनवर होणारी वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी १६३ कोटी रूपये खर्च करून दोन नव्या उड्डाणपुलांची निर्मिती करण्याचे काम सुरू झाले आहे. या दोन्ही पुलांची लांबी वांद्रे-कुर्ला संकुल ते सी लिंक तसेच सी लिंक ते वांद्रे कुर्ला संकुल अशी १८८८ मीटर इतकी असणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल आणि सांताक्रूज-चेंबूर जोडरस्ता (एससीएलआर) या जंक्शनवरील गर्दी कमी करण्यासाठी ४४९ रूपये खर्च करून दोन नवे रस्ते बांधण्यात येणार आहेत. एमटीएनएल जंक्शन ते एलबीएस उड्डाणपूल या क्षेत्रातून जाणार्‍या १.३ किमी लांबीच्या रस्त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलातील गर्दी कमी होईल.

- Advertisement -

मुंबईला जोडणार्‍या प्रकल्पांची काय स्थिती आहे ?
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला गतिमान जोडणी देण्यासाठी तसेच त्या भागातील गर्दी कमी करण्यासाठी दोन पूल उभारण्यात येणार आहेत. ६५० मीटर लांबीचा माणकोली पूल आणि ६५५ मीटर लांबीचा राजनौली पूल हे दोन पूल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील. या कामासाठी नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस हे दोन्ही पूल उभारण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे. नवघर ते बेलावली या बहुउद्देशीय मार्गाच्या उभारणीसाठी प्रकल्प अंमलबजावणी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भूमीसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि पुनर्वसाहत, कंत्राटदारांच्या नियुक्त्या, कायदेशीर बाबींची हाताळणी, विविध परवानग्यांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या यंत्रणांशी समन्वय अशा गुंतागुंतीच्या बाबींमध्ये लक्ष घालून प्रकल्पांना गती देण्याचे काम या पथकाच्या पुढाकाराने शक्य होईल.

मुंबई महानगर प्रदेशाच्या क्षेत्रातील वाढ का गरजेची आहे ?
पालघर तालुका, वसई तालुक्यातील उर्वरित भाग तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूरचा समावेश आता मुंबई महानगर प्रदेशामध्ये करण्यात आलेला आहे. या क्षेत्रवाढीच्या निर्णयामुळे सर्व परिसराचा वेगवान विकास होणार आहे. या परिसराची विकासाची क्षमता प्रचंड आहे. सध्याच्या अनिर्बंध वाढीवर अंकुश ठेवण्याची त्यामुळेच मोठी गरज निर्माण झाली आहे. वाढीव परिसराचा यापुढच्या काळात नियोजनबद्ध आणि शाश्वत स्वरूपाचा विकास करणे गरजेचे आहे. या प्रदेशाच्या विकासासाठी मदतीच्या ठरणार्‍या अशा विकास केंद्रांच्या उभारणीवरही भर देण्यात येणार आहे.

एमएमआरडीएतील वॉर रूममध्ये काय अपेक्षित आहे ?
मंत्रालयातील वॉर रूमच्या धर्तीवरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात वॉररूम तसेच इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. प्राधिकरणाने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांच्या गतीमान अंमलबजावणीसाठी वॉर रूमची गरज होती. वॉर रूमचा मुख्य उद्देश म्हणजे प्राधिकरणातील विविध प्रकल्प मार्गी लावणे हा आहे. अडचणीच्या प्रसंगी विचार करण्यासाठीची हमखास जागा म्हणून वॉर रूमची सुरूवात करण्यात आली आहे. तातडीचे निर्णय घेण्यासाठी वॉर रूमची मदत होणार आहे. तसेच प्राधिकरणाच्या विकासाला उपयुक्त असे संशोधनही याठिकाणच्या इनोव्हेशन सेंटरमधून अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -