घरमुंबईभिवंडीत सुंगधी धूप गोदामाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

भिवंडीत सुंगधी धूप गोदामाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

Subscribe

भिवंडी तालुक्यातील दुमजली गोदामाला भीषण आग लागली असून या आगीत लाखोंचे सुंगधी धूप (लोबान) जळून खाक झाले आहे.

ज्वामुखीच्या उंबरठ्यावर असलेल्या भिवंडी तालुक्याच्या गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरूच असून आज, मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पुन्हा दुमजली असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे सुंगधी धूप (लोबान) जळून खाक झाले आहे. ही आगीची घटना भिवंडी तालुक्यातील पुर्णा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कापऱ्या बाबा कंपाऊंडमधील प्रीमियर ट्रेडर्सच्या पहिल्या मजल्यावरील सुंगधी धूप (लोबान) साठवून ठेवलेल्या गोदामात घडली.

भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोदाम व्यवसाय फोफावला आहे. दिवाळीनिमित्त या गोदाम परिसरातील सर्व व्यवहार ठप्प असताना पूर्णा ग्रामपंचायतीच्या बस स्टॉपसमोरील कापऱ्या बाबा कंपाऊंड येथील भरतभाई यांच्या मालकीच्या प्रीमियर ट्रेडर्सच्या पहिल्या मजल्यावरील गोदामात डिंक, मेण व देव पुजेसाठी वापरले जाणारे सुगंधी धूप (लोबान) यांचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवला होता. त्या ठिकाणी आज, मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ बाहेर पडू लागताच या आगीची माहिती स्थानिकांनी भिवंडी अग्निशमन दलास दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी दत्ता साळवी यांनी जवानांसोबत दोन फायर गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची व्याप्ती अधिक असल्याने त्यांनी ठाणे येथील अग्निशमन दलाला देखील पाचारण केले. आगीच्या ठिकाणी पहिल्या मजल्यावरील गोदामातून फक्त धूर दिसून येत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पुर्णा ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा प्रफुल्ल खंडागळे यांनी वरिष्ठ लिपिक विनायक पाटील यांना स्थानिक ग्रामस्थांकडून जेसीबी व खासगी पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून घेण्यास सांगून जेसीबीच्या मदतीने गोदामाच्या भिंती तोडल्यानंतर आगीचे लोळ बाहेर पडले. त्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून अथक प्रयत्नानंतर तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त या परिसरातील सर्वच गोदाम बंद असताना या गोदामाला नक्की आग कशी लागली?, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे येथील वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना या नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या असतात. या आगीच्या घटनेत लाखो रुपयांचे सुगंधी धूप (लोबान) जळून खाक झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीच्या दुर्घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात केली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील पुर्णा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कापऱ्या बाबा कंपाऊंडमधील प्रीमियर ट्रेडर्सच्या पहिल्या मजल्यावरील सुंगधी धूप (लोबान) साठवून ठेवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याने या आगीवर दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र त्यानंतर गोदामाच्या इमारतीचे दोन्ही मजले कोसळून दुर्घटना घडली आहे. या इमारतीचे बांधकाम कमकुवत असल्याने ती कोसळली असल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

हेही वाचा –

दोन अपक्ष आमदारांचा भाजपला,तर आणखी एकाचा शिवसेनेला पाठिंबा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -