घरमुंबईनिवडणुकांमध्ये पहिल्यांदाच जीपीएस यंत्रणेचा वापर

निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच जीपीएस यंत्रणेचा वापर

Subscribe

मध्यवर्ती कक्षातूनच रिअल टाईम ट्रॅकिंग होणार

लोकसभा निवडणुकीसाठी काम करणार्‍या वाहनांसाठी यंदा पहिल्यांदाच जीपीएस यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने वाहनांचे वेळोवेळी ट्रॅकिंग करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. लोकसभा निवडणुकासाठी वापरण्यात येणार्‍या संपुर्ण यंत्रणेचा वेळ वाचावा तसेच कारभारात पारदर्शकता यावी हा या ट्रॅकिंग सिस्टिमचा उद्देश ठेवण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीनमध्ये होणार्‍या बिघाडाच्या प्रसंगी तातडीने मदतीसाठी ही जीपीएस सिस्टिम उपयुक्त ठरणार आहे.

मतदानाच्या दिवशी अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे ईव्हीएम मशीन बंद पडतात. अशावेळी अतिरिक्त ईव्हीएम मशीन पोहचवणारे वाहन हे तत्काळ मदतीसाठी पोहचावे हा ट्रॅकिंग मागचा उद्देश आहे. तसेच मदत पोहचवणारे वाहन हे त्याच्यासाठी निश्चित सीमेपलीकडे जात नाही ना याचीही खातरजमा या यंत्रणेतून करण्यात येणार आहे. त्यासाठीच निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांसाठी जीपीएस यंत्रणा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांचे वेळोवेळी ट्रॅकिंग करणे शक्य होईल अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली. रिअल टाईम पद्धतीने हा वाहनांचे ट्रॅकिंंग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने यंदा सी विजिल हे एप्लिकेशन विकसित केले आहे. आचारसंहिता भंग होत असल्याची तक्रार आल्यावर भरारी पथक तत्काळ त्याठिकाणी पोहचावे हा एप्लिकेशनचा उद्देश आहे. त्यासाठी भरारी पथकातील सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. सरकारी तसेच खाजगी तत्वावर घेतलेल्या सर्व वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा असेल या अनुषंगानेच वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. याचा उद्देश म्हणजे सर्वात नजीकची टीम वाहनासह घटनास्थळी पोहचावे हा आहे. त्यामुळे भरारी पथकाचे नेमके ठिकाणी शोधणे, घटनास्थळी जाण्यासाठी लागणारा वेळ यासारख्या गोष्टींचे मॉनिटरींग करणेही निवडणुक आयोगाला शक्य होणार आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचा फोटो किंवा व्हिडिओ नागरिकांनी अपलोड करून तक्रार करणे हे एप्लिकेशनला अपेक्षित आहे.

ईव्हीएम मशीन नेणार्‍या वाहनांचेही ट्रॅकिंग
संपुर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे आहेत. राज्यात ४८ मतदारसंघात एकुण चार टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. एकुण २.१५ लाख बॅलेट युनिट, १.२४ लाख कंट्रोल युनिट आणि १.२५ लाख व्हीव्हीपॅट मशीनचा वापर या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर निवडणुकीचे साहित्य तसेच मशीन पोहच करण्याचे काम महत्वाचे असणार आहे. राज्याअंतर्गत इतर ठिकाणाहून येणार्‍या मशीनही जीपीएस व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमच्या माध्यमातून पोहचवण्यात आल्या आहेत.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -