घरमुंबईमहापालिकेने घेतले पाच कुत्र्यांचे बळी

महापालिकेने घेतले पाच कुत्र्यांचे बळी

Subscribe

प्राणीमित्रांची पोलिसांत तक्रार

दिवाळीच्या सुट्टीत वसई-विरार महापालिकेने 5 कुत्र्यांचे नाहक बळी घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलीस ठाण्यात प्राणीमित्रांनी तक्रार केली आहे. वसई तालुक्यात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिकेने वसईत अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल केंद्र सुरु केले. या केंद्राचा कारभार उत्कर्ष स्टार मित्र मंडळाद्वारे पाहिला जात आहे. शहरातील भटके कुत्रे पकडून आणल्यानंतर त्यांचे निर्बीजीकरण करायचे आणि पुन्हा त्याच जागी नेवून सोडायचे अशी जबाबदारी या केंद्रावर सोपवण्यात आली होती. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर या केंद्रात पाच कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

प्राणीप्रेमी आरती खुराना यांनी आपल्या परिसरातील काही कुत्र्यांना या केंद्रात ठेवले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी त्या या केंद्रात गेल्या असता, या केंद्रात अधिकारी, सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. आपल्या कुत्र्यांच्या शोधात केंद्रात फिरत असताना त्यांना दोन कुत्र्यांचे मृतदेह आढळले. कुत्र्यांसाठी खानपानाची व्यवस्थाही या केंद्रात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पिंजर्‍यातील कुत्रे भुकेने व्याकुळ होऊन निपचित पडले होते. या सर्व परिस्थितीचे खुराना यांनी चित्रिकरण करून प्राणीमित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकले.

- Advertisement -

ही माहिती मिळाल्यावर जिल्हा प्राणी वेल्फेअर ऑफीसर मितेश जैन, विमलेश नवानी, प्राणीप्रेमी अमनप्रीत वालीया,अ‍ॅड.रिना रिचर्ड अ‍ॅनिमल केंद्रात पोहोचले. त्यावेळी त्यांना सर्व कर्मचारी 10 दिवसांपूर्वीच सुट्टीवर गेल्याचे अनिल नावाच्या एका कर्मचार्‍याने सांगितले. ही बाब ऐकूण प्राणीमित्रांनी तडक पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. या दरम्यान,उत्कर्ष स्टार्सचे सेक्रेटरी अ‍ॅड. डी. आर. लोंढे यांनी मृत कुत्र्यांना कोरा केंद्रात नेऊन टाकले. प्राणीप्रेमींनी त्यांना पोलिसांच्या उपस्थितीत कोराकेंद्रातून ताब्यात घेतले. परळच्या बीएसपीसीए हॉस्पिटलमध्ये रात्री 2 वाजता शवविच्छेदनासाठी पाठवले. दुसर्‍या दिवशी माणिकपूर पोलीस ठाण्यात प्राणीप्रेमींनी लेखी तक्रार केली. गेल्या 6 दिवसांत 5 कुत्र्यांचा अशाप्रकारे नाहक बळी गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मात्र, सावध भूमिका घेतली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे माणिकपूर पोलिसांनी सांगितले.

प्राण्यांचा प्राणांतिक छळ करून ठार मारण्यास कारणीभूत ठरलेल्या अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. हे केंद्र चालवणार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी,अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसेच नसबंदी केल्यानंतर ओळख पटण्यासाठी कानाला लहानसे छिद्र केले जाते, मात्र या केंद्रात कुत्र्याचा अक्षरशः अर्धा कान कापला जातो. त्यावर उपचार न करता कुत्र्यांना तसेच सोडून दिले जाते, असे यावेळी प्राणीप्रेमी अनुपमा क्लेमेंट यांनी सांगितले. तर आणलेल्या परिसरात कुत्र्यांना न सोडता दुसर्‍याच ठिकाणी सोडण्यात येत असल्यामुळे कुत्र्यांच्या गटात हाणामारी होते. त्याचा फटका रहिवाशांना बसत असल्याचे यावेळी अ‍ॅड.नीतु सावंत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -