घरमुंबईठाण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या पाच जणांना अटक

ठाण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या पाच जणांना अटक

Subscribe

कोरोना रुग्णांना दिल्या जाणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार मुंबईसह ठाण्यातही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मुंबई, मीरारोड नंतर ठाण्यात देखील या औषधाच्या काळाबाजाराचे मोठे रॅकेट ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने उद्ध्वस्त केले. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या पाच जणांना अटक केली आहे. रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या दलालांचे थेट संबंध शहरातील बड्या रुग्णालयांशी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अरुण रामजी सिंग (३५), सुधाकर गिरी (३७), रवींद्र शिंदे (३५), वसीम शेख (३२) आणि अमिताभ निर्मल दास (३९) असे अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत. मुंबई आणि नवी मुंबईत राहणारे हे दलाल मंगळवारी दुपारी ठाण्यातील नौपाडा, तीन पेट्रोल पंप या ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करण्यास येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती.

- Advertisement -

या माहितीच्या आधारे कोथमिरे यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्यासोबत सदर ठिकाणी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कर्करोगावरील एक ‘टॉसिलीझूमब’ इंजेक्शन हस्तगत केले आहे. या दोन्ही इंजेक्शनचा बाजारात तुटवडा असून त्याची २५ ते ८० हजार रुपयांना विक्री करण्यात येणार होती, अशी माहिती चौकशी समोर आली आहे.

अटक करण्यात आलेले पाचही दलाल असून त्यांची मोठी साखळी आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ही साखळी कार्यरत असून या साखळीचे काही धागेदोरे शहरातील बड्या रुग्णालयाशी जुळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच या साखळीमध्ये काही औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींचादेखील समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -