घरमुंबईशिवसेनेला रेसकोर्स थिमपार्कचा विसर

शिवसेनेला रेसकोर्स थिमपार्कचा विसर

Subscribe

युती सरकारात नाही,आता ठाकरे सरकार आल्यानंतरही थिमपार्क होणार का?

महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिम पार्क विकसित करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी तत्कालिन पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे २०१२मध्ये केली होती. परंतु दोन वर्षांनंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार येवूनही शिवसेनेच्या या थिमपार्कचे स्वप्न साकार होवू शकले नाही. परंतु आता शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. आतातरी हे थिमपार्क होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ही महापालिका आणि राज्य सरकारची संयुक्त अशी असून रेसकोर्सची ही जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला ९९ वर्षाच्या भाडेकरारावर दिली होती. हा भाडेकरार ३१ मे २०१३ रोजी संपुष्टात आल्यानंतर त्यांना भाडेकरार वाढवून न देता ती जागा त्यांच्याकडून परत ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, याला सात वर्षे उलटत आली तरी सरकारने ही रेसकोर्सची जमीन महापालिकेला थिमपार्क उभारण्यासाठी हस्तांतरीत करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या संकल्पनेतील थिमपार्क अजूनही लालफितीतच अडकलेले असून भाजपने याठिकाणी प्रशस्त रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, नुतनीकरण न केल्यामुळे आजही रेसकोर्सची जागा रॉयल टर्फ क्लबच्या ताब्यातच असून महापालिकेला एकही पैसा न देता कोट्यवधी रुपयांची कमाईत संबंधित कंपनी करत आहे.

- Advertisement -

सन २०१३ मध्ये शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना याबाबतचे संकल्पचित्र सादर करून निवेदनही दिले होते. त्यानंतर महापालिकेतील नेते व तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी २५ जून २०१३रोजी ठरावाची सूचना मांडून महालक्ष्मी येथे असलेल्या घोडयाच्या शर्यतीसाठी सध्या वापरण्यात येणारा भूखंड महापालिकेने त्वरित आपल्या ताब्यात घेऊन त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिम पार्क विकसित करावे, अशी मागणी केली होती.

याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिम पार्क विकसित केल्यास देश-विदेशातून मुंबईत येणारे असंख्य पर्यटक मुंबईकडे आकर्षित होऊन उद्यानाला भेट देतील. यामुळे मुंबईतील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असे मत त्यांनी या ठरावाच्या सूचनेद्वारे व्यक्त केले होते. त्यानुसार ठराव करून नगरविकास खात्याला पाठवले होते. परंतु आजतागायत सरकारकडून निर्णय न घेतल्यामुळे शिवसेना अजूनही या थिम पार्कच्या प्रतीक्षेतच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -