घरमुंबईखान्देश खडसेंकडून महाजनांकडे

खान्देश खडसेंकडून महाजनांकडे

Subscribe

उत्तर महाराष्ट्राचा चेहरा म्हणून आजवर ज्यांच्या नावाचा गवगवा होता, ते भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा या भागावरील प्रभाव पुरता संपल्याचे चित्र सोमवारच्या धुळे महापालिकेच्या निवडणुकांमधून पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात असलेले गिरीष महाजन यांच्या वाढत्या प्रभावाने खडसेंचा सुपडा साफ केला. याआधी नाशिक आणि जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीतही खडसेंना पक्षाने फारशी किंमत दिली नाही. आता खान्देशातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या धुळे महानगरपालिका निवडणुकीत खडसे यांचे प्रतिस्पर्धी आणि पक्षांतर्गत विरोधक असलेल्या महाजन यांनी भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली. उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशात आपणच शेरास सव्वाशेर असल्याचे दाखवून देत विजयाची हॅट्ट्रीक केली आहे..

भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातील सर्वश्रेष्ठ नेते म्हणून आजवर एकनाथ खडसे यांच्या नावाचे वलय होते. युती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री त्यानंतर काँग्रेस आघाडीच्या सरकारवेळचे विरोधी पक्षनेते म्हणून खडसे यांनी कमालीचा दबदबा निर्माण केला होता. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काँग्रेस आघाडी सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडली नव्हती. राज्य भाजपमधील पहिल्या क्रमांकाचा मान खडसेंना होता. मात्र राज्यात सत्ता आल्यापासून त्यांचे पंख पद्धतशीरपणे कापण्यात आले. जळगाव ही त्यांची कर्मभूमी. गणेश पाटील नामक त्यांच्या कुठल्याशा पीएला पैशांची मागणी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याचे निमित्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना मंत्रिपदावरून दूर केले. या प्रकरणाच्या चौकशीत एसीबीने खडसे यांना निर्दोषही सोडले. तरीही मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लावण्यात आली नाही. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची सूत्रे खडसे यांच्याकडे देण्यात येतील, अशी शक्यता वर्तवली जात असताना निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याऐवजी त्यांना ज्युनियर असलेल्या गिरीष महाजन यांच्याकडे देण्यात आली.

- Advertisement -

महाजन यांच्याकडे जबाबदारी आल्यावर या पालिकेच्या निवडणुकीतून खडसे यांना पध्दतशीरपणे दूर ठेवण्यात आले. ७८ जागांच्या या पालिकेत ४१ ठिकाणी विजय मिळवत महाजन यांनी भाजपला यश मिळवून दिले.आता धुळे पालिका निवडणुकीच्या जबाबदारीतूनही खडसे यांना दूर ठेवण्यात आले. खडसेंचे समर्थक गणले जाणारे तिथले भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्याकडे किमान जबाबदारी देण्यात येईल, असे वाटत असताना त्यांच्याऐवजी पुन्हा महाजन यांच्याकडे तिथली जबाबदारी देण्यात आली. यामुळे गोटे प्रचंड संतापले. याच रागातून या निवडणुकीत त्यांनी आपले स्वतंत्र पॅनेल उभे केले. या पालिकेच्या प्रचारात खडसेंचे नामोनिशाणही ठेवण्यात आले नाही. या पालिकेतील ५० जागा जिंकून महाजन यांनी पुन्हा भाजपला यश मिळवून दिले. यशाचा हा चढता क्रम लक्षात घेता आता खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रावरील खडसेंची पकड कमी झाल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.

गुंडगिरी आणि ईव्हीएम मॅनेज केल्याने विजय – गोटे

धुळ्यात इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपला यश मिळणे, हा केवळ आणि केवळ गुंडगिरी आणि ईव्हीएम मशीन मॅनेज केल्याचा विजय असल्याचा आक्षेप धुळे पालिका निवडणुकीतील भाजपचे बंडखोर नेते अनिल गोटे यांनी घेतला आहे. गिरीष महाजनांना गुंड सांभाळायची सवय आहे, गुंडांना हाताशी धरुन ईव्हीएम मशिन मॅनेज करुन त्यांनी हा विजय मिळवला. किती इव्हीएम मॅनेज करणार आहोत याचे नियोजन त्यांनी आधीच केले होते. याशिवाय पैशाच्या थैल्या ओतल्या गेल्या. ही निवडणूक नाही तर धुळेकरांची फसवणूक आहे.

- Advertisement -

धुळ्यात रांगा लावून पैशांचे वाटप झाले. गिरीष महाजनांनी पोलिसांना मॅनेज केलेच, पण धुळ्यातल्या निवडणुकीला ११ निवडणूक अधिकारी जळगाव जिल्ह्यातून बोलावण्यात आले होते. जर हे एवढे लोकप्रिय होते तर मुख्यमंत्र्यांच्या सभेला ५०० रुपये देऊन लोक का बोलावले, असा सवाल त्यांनी केला. महाजनांना लोकांनी मतदान केलं नाही, त्यांनी लोकसंग्रामला मतदान केलं आणि मशिननं भाजपाला मतदान केलं, असा दावाही त्यांनी यावेळी केला. धुळ्याबद्दल महाजनांना काहीही माहिती नाही, त्यामुळे त्यांना धुळ्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. महाजनांसारखा लबाड आणि खोटा माणूस जगात नाही. मुख्यमंत्र्यांनीही माझी फसवणूक केली, त्यामुळे हे भाजपाचं नव्हे तर विश्वासघाताचं यश आहे.

जनतेनेच गोटेंना जागा दाखवली – गिरीष महाजन

अनिल गोटेंनी अतिशय खालच्या पातळीवरून भाजप नेत्यांवर आणि मंत्र्यांवर टीका केली. निवडणुकीची सूत्रे माझ्या हाती दिल्याने सभेमध्ये गोंधळ घातला. नेत्यांना शिवीगाळ केली. पण गोटेंना जनतेनेच धडा शिकवला. पक्षापेक्षा आपण मोठे आहोत असे दाखवण्याचा गोटेंचा प्रयत्न होता. पण जनतेने त्यांना निवडणुकीत योग्य जागा दाखवली. त्यांचा एकच उमेदवार निवडून आला, असं जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्हणाले

साम, दाम, दंड, भेदाचा विजय – खासदार अशोक चव्हाण

धुळे महानगरपालिकेतील विजय हा भाजपचा नसून साम, दाम, दंड भेदाचा विजय आहे. पालघर लोकसभा निवडणुकीत स्वमुखातूनच मुख्यमंत्र्यांनी भाजपची रणनीती स्पष्ट केलेली आहे. तसेच त्यांचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अधिकृतपणे लक्ष्मी दर्शनास मान्यता दिलेली आहे. गुंडाना पक्ष प्रवेश इतर पक्षातील लोकांना आमिषे दाखवून, भीती दाखवून फोडणे, पैशाचा खुलेआम वापर आणि निवडणूक यंत्रणेला धाब्यावर बसवणे. या सर्व गैर प्रकारातूनच विजयाचा फॉर्म्युला भाजपने तयार केला आहे. काँग्रेस पक्षाने गेल्या पंधरा वर्षापासून आघाडीतील मित्र पक्षासाठी हे मतदारसंघ सोडले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. तरीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या धनशक्तीचा निकराने विरोध केला आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या या कौरवनीतीचा पाडाव जनताच करेल.

धुळेकरांचे आभार

धुळे महानगरपालिकेत 3 जागांवरून 50 जागांपर्यंत भक्कम यश संपादन करीत भाजपने बहुमत प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. या यशासाठी परिश्रम घेणार्‍या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. धुळ्यातील जनतेने जो ठाम विश्वास भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर दाखविला, तो सार्थकी लावू आणि एक स्वच्छ आणि भयमुक्त प्रशासन तेथील महापालिकेच्या माध्यमातून भाजपा देईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -