घरमुंबई३८९ वीजचोरीप्रकरणी ८३ लाखांचा दंड वसूल

३८९ वीजचोरीप्रकरणी ८३ लाखांचा दंड वसूल

Subscribe

पनवेल डिव्हिजनमध्ये गेल्या वर्षभरात ३८९ वीजचोरीची प्रकरणे निदर्शनास आली असून महावितरणने एक कोटी बारा लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी ८३ लाखांचा दंड वसूल करण्यात महावितरणच्या पनवेल शहर विभागाला यश आले आहे. वीजचोरीची माहिती देणार्‍याला एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात यायचे. मग ती वीजचोरी किती रुपयांची असेल तरीही बक्षिसाची रक्कम मात्र ठरलेली होती. त्यामुळे त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता मात्र वीजचोरीची माहिती कळवणार्‍यास वीजचोरी अनुमानित रकमेच्या दहा टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

या योजनेंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतच्या बक्षिसाची रक्कम मंजूर करण्याचे अधिकार महावितरणच्या क्षेत्रीय कार्यकारी अभियंत्यांना, एक लाखापर्यंतच्या बक्षिसाचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना आणि बक्षिसाची रक्कम एक लाखापेक्षा अधिक होत असल्यास ती देण्याचे अधिकार मुख्य अभियंत्यांना असतील. याशिवाय संचालक (दक्षता व सुरक्षा) यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही महावितरणला सहन करावे लागायचे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरणने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रकमेचे बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे. झोपड्यांमध्ये सर्वाधिक वीजचोरी होती.

- Advertisement -

पण काही महिन्यापूर्वी पनवेल उपविभागीय महावितरण कंपनीने धडक कारवाई करून एका झोपडपट्टी गुंडाच्या मुसक्या आवळल्या. एमएसईबीच्या कल्याण येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे झोपडपट्टीमधील वीजचोरीवर काही प्रमाणात अंकुश बसला आहे. तरीही मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरीचे प्रकार वाढले आहेत. झोपडपट्टीत राहणार्‍यांच्या झोपडीत या आधी मीटर बसवल्याने मीटरमध्ये बिघाड करून वीज चोरीसारखे प्रकार नेहमी घडत असत. पनवेल परिसरात नवनाथ नगर, वैद्यवाडी तक्का, आझाद नगर, नेहरू नगर, लोकमान्य नगर, लक्ष्मी वसाहत, भिंगरी तसेच पटेल मोहल्ला येथे १३० मल्टीमीटर बॉक्स बसवण्यात आले आहेत. या १३० मल्टिबॉक्समध्ये एकूण १५६० मीटर बसवून मोठ्या प्रमाणात चोरीला आळा घालण्यात आला आहे.

भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून होणार्‍या वीजचोर्‍यांसह अन्य प्रकारच्या वीजचोर्‍यांबाबत माहिती असणार्‍यांनी पुढाकार घेत माहिती द्यावी, माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
-माणिक राठोड, कार्यकारी अभियंता, पनवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -