घरमुंबईकॅन्सरचा इलाज हे सरकार बाम लावून करतंय - गौरव वल्लभ

कॅन्सरचा इलाज हे सरकार बाम लावून करतंय – गौरव वल्लभ

Subscribe

सध्या देशात मंदीचे सावट असून, अनेक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या मंदीवरूनच आता विरोधक सरकारवर टीका करत असून, काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी आजार कॅन्सरचा झालेला असताना हे सरकार बाम लावून इलाज करत असल्याचा आरोप केला. हे सरकार मंदीवर न बोलता पाच ट्रेलियनच्या बाता मारतात. यांच्या भाषणात नेहमीच पाचचा आकडा असतो. त्यामुळे या सरकारला पाच हा आकडा लोकप्रिय झाला आहे, असे वाटत असल्याची टीकादेखील त्यांनी यावेळी केली. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत आर्थिक मंदीवरून सरकारवर निशाणा साधला.

देशात सध्या कुलूप बनवण्याचे उत्पादन वाढले 

देशात सध्या भयंकर मंदी असून सर्वच क्षेत्रात ही मंदी पाहायला मिळत आहे. कृषी क्षेत्रातदेखील मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट आहे. आज ऑटो सेक्टरमध्येही घसरण झाली आहे. ऑटो मोबाईल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे मेक इन इंडियाची भाषा करणाऱ्या या सरकारच्या काळात कुलूप बनवण्याचे उत्पादन वाढले आहे. कारण देशात मोठमोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. तसेच त्यांना टाळे लागत असल्याचे सांगत त्यांनी वाढत्या बेरोजगारीवरून सरकारवर टीका केली. तसेच नोटाबंदीचा फसलेला निर्णय आणि जीएसटीची योग्य अंमलबजावणी न केल्याने देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या सरकारने आता लोकांची माफी मागायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर बजेटमध्ये जे सांगितले जाते त्यामध्ये ३ महिन्यात बदल होतो, असा यांचा कारभार असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच आरबीआयला यांनी कसे लुटले हे सर्व जनतेने पाहिले आहे. आरबीयकडून पैसे घेतले खरे पण ते खर्च करणार याचे कोणतेही उत्तर सरकारकडे नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -

सरकारने यापूर्वी अनेकदा मेक इन महाराष्ट्रात ३० लाख नवीन रोजगार देऊ, असे सांगितले. मात्र त्याचे अजूनही काहीच झाले नाही. राज्यात ७३ लाख नवीन रोजगार निर्माण व्हायला हवे होते. मात्र सध्या एकही रोजगार निर्मिती झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. यापूर्वी २००८ मध्ये देखील मोठ्या प्रमाणात मंदी होती. मात्र त्यावेळी देशाचे नेतृत्व एक योग्य व्यक्ती करत असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. मागील पाच वर्षात आरबीआयचे ३ गव्हर्नर येऊन गेले. यांच्यासोबत कोणताही तज्ज्ञ काम करायला तयार नाही, असे सांगत त्यांनी मोदींच्या कारभारावर टीका केली. बेरोजगारी पाहता आता युवक ‘मला नोकरी का मिळत नाही?’, असा प्रश्न या सरकारला विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढंच नाही तर भारतातील लोकं आता दुसऱ्या देशात जास्त गुंतवणूक करायला लागल्याचेही त्यांनी सागितले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कशा पद्धतीने तयारी करत असल्याचे विचारले असता, आम्ही महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणाची निवडणूक गंभीरपणे लढू. आम्ही लोकांना यांच्यासारखे भ्रमित करणार नाही, असे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -