घरमुंबईअमेरिकेतील माजी महापौरांचा मराठी शाळेसाठी निधी

अमेरिकेतील माजी महापौरांचा मराठी शाळेसाठी निधी

Subscribe

1963च्या दहावीच्या बॅचचे ‘सत्तरी संमेलन’

अमेरिकेतील नामवंत व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून भारतामध्ये शैक्षणिक संस्था उघडण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. मात्र फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो शहराचे माजी महापौर यांनी थेट मुंबईतील एका मराठी शाळेसाठी निधी दिला आहे. हा निधी त्यांनी त्यांच्या दहावीच्या वर्गमित्रांच्या माध्यमातून जमा केला आहे. त्यामुळे मराठी शाळेला अमेरिकेतील एका महापौराने निधी देण्याची ही पहिलीच घटना असू शकते. मराठी शाळेला निधी देणारे महापौरांचे नाव अनिल देशपांडे आहे. शिकून-सवरून जगाच्या पाठीवर माणूस नोकरी-धंद्यासाठी कोठेही गेला तरी तो आपली शाळा आणि शाळेतले वर्गमित्र यांना विसरत नाही. याचा प्रत्यय नुकताच आला. सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस. हायस्कूलमधून १९६३ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन करीअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळल्यामुळे वेगळे झालेले वर्गमित्र आणि वर्गमित्रिणी तब्बल ५६ वर्षांनी एकत्र आले. सर्व वर्गमित्रांना एकत्र आणण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेले शाळेची माजी विद्यार्थी अनिल देशपांडे यांनी पुढाकार घेतला. वयाच्या सत्तरीत असलेले अनिल देशपांडे हे डी.एस.

हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि तिथे खूप मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारुपाला आले. अमेरिकेतील पहिल्या १० मोठ्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो शहराचे महापौरपदही त्यांनी भूषवले आहे. ज्यांच्यासोबत आपण शैक्षणिक श्रीगणेशा केला त्या आपल्या वर्गमित्रांना तसेच वर्गमैत्रिणींना भेटण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यासाठी १९६३ मध्ये डी.एस. हायस्कूलमधून शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बॅचला एकत्र आणण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांच्या मदतीला भारतातील त्यांच्या व्यवसायाचे सहकारी आणि वर्गमित्र अशोक दोशी धावून आले.

- Advertisement -

शाळेतून आपल्या बॅचची यादी मिळवून प्रत्येकाला जमेल तसा संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वर्गमित्रांपैकी कोणी पुणे, कोणी हैदराबादला तर कोणी बंगळूरला होते. या सर्वांना संपर्क साधून एकत्र आणणे ही काही साधी गोष्ट नव्हती, पण शाळेवरील प्रेमापोटी अनिल देशपांडे आणि अशोक दोशी यांनी त्यांच्या सर्व वर्गमित्रांना एकत्र आणले, अशी माहिती डी.एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.तब्बल ५६ वर्षांनी आपल्या शाळेत एकत्र आलेल्या सत्तरीतल्या ह्या माजी विद्यार्थ्यांचा उत्साह अतिशय दांडगा होता. हसतखेळत त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. आपण ज्या शाळेत शिकलो ती आपली शाळा उत्तम प्रगतीपथावर असल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला, असेही राजेंद्र प्रधान यांनी सांगितले.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम डी.एस. हायस्कूल करत आहे. शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. आमची शाळा अधिकाधिक सक्षम व्हावी, तिच्यात विद्यार्थ्यांसाठी आणखी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जावेत, यासाठी शाळेला आर्थिक सहकार्य करण्याचा निर्धार आम्ही सत्तरीतल्या वर्गमित्रांनी केला आहे. शाळेच्या प्रगतीसाठी हातभार लावणे हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्यच आहे.
– अनिल देशपांडे, ओरलँडोचे माजी महापौर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -