घरमुंबईबाप्पांचे आगमन खड्ड्यांतून, गणेश मंडळांवर चिंतेचे सावट

बाप्पांचे आगमन खड्ड्यांतून, गणेश मंडळांवर चिंतेचे सावट

Subscribe

मुंबई : सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आज आगमन होत आहे. आगमनाचा दिवस आला तरी मुंबईमधील रस्त्यांवरील खड्डे बुजावण्यात पालिकेला अपयश आले आहे. सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन खडड्यातूनच होणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो म्हणून गणेशोत्सव मंडळांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. उत्सव साजरा करण्यापूर्वी केल्या जाणार्‍या उपायोजनाबाबत महापौर, पालिका आयुक्त व वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आढावा बैठक आयोजित केल्या जातात. या बैठकांमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रारी केल्या जातात. पालिकेकडून कारवाई करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र रस्त्यांवरील खड्डे बुजवलेच जात नसल्याने गणेशोत्सवादरम्यान गणरायांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत असतो. यावर्षीही पालिकेने खड्डे बुजवण्याची डेडलाईन पाळली नसल्याने असाच त्रास गणेशोस्तव मंडळांना सहन करावा लागणार आहे.

- Advertisement -

पालिकेच्या रस्ते विभागाचे मुख्य अभियंता विनोद चिटोरे यांनी १० जूनपासून शहरात खड्डे पडल्याच्या २६१२ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी २३९२ तक्रारींची दखल घेण्यात आली असून २२० तक्रारी प्रलंबित आहेत. खड्डे बुजवण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी आठवडाभरापूर्वी सांगितली होते. त्यावेळी गणेशोत्सव मंडळाने पालिकेच्या रस्ते विभाग किंवा वॉर्डकडे खड्ड्यांबाबत एकही तक्रार केलेली नाही असा दावा त्यांनी केला होता. गणरायाच्या आगमनाचा दिवस आला तरी अनेक रस्त्यांवर खड्डे असल्याने पालिकेने काय उपाययोजना केली आहे याची विचारणा चिटोरे यांना करण्यास गेल्यावर चिटोरे यांनी मिटिंगमध्ये व्यस्त असल्याने भेटू शकत नसल्याचे कळविले.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबाबत गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालिका खड्ड्यांच्या तक्रारींबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला आहे. महापौर, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान फोटो देण्यात आले आहेत. परंतु त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. मी समन्वय समितीचा अध्यक्ष असताना माझ्याच तक्रारींवर कार्यवाही झालेली नाही, मग सामान्य कार्यकर्त्यांच्या तक्रारींवर कार्यवाही होत असेल का असा प्रश्न दहिबावकर यांनी उपस्थित केला आहे. ज्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्या रस्त्यावरून मूर्ती नेताना मूर्तीला धक्का लागणार असेल तर खड्ड्यामध्ये गोणी टाकावी. त्यावर स्टीलची प्लेट टाकावी व त्यानंतर मूर्तीची ट्रॉली न्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जनाला उशीर होण्याची शक्यता वर्तवताना यासाठी संबंधित प्रशासनाला दोषी धरावे असे दहिबावकर यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईत सर्वत्र खड्डे आहेत. त्याला सत्ताधारी शिवसेना जबाबदार आहे. सत्ताधार्‍यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने खड्डे बुजवण्याची कामे होत नाहीत.  – रवी राजा, विरोधी पक्ष नेते

बाप्पाच्या आशीर्वादाने आगमन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. आता राहिला प्रश्न विसर्जनाचा, रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे काही विघ्न येऊ नये याकरिता पालिका प्रशासनाने काळजी घ्यावी. खड्डे लवकरात लवकर बुजवावेत. -आशुतोष देसाई, कामाठीपुराचा मोरेश्वर

आमची शाडू मातीची गणेशमूर्ती असते. मातीची मूर्ती नाजूक असते म्हणून तिला खूप जपावी लागते. खड्यांमुळे मूर्तीची जास्त काळजी घ्यावी लागेल. जर का खड्ड्यात गाडी गेली तर त्या धक्क्यामुळे मूर्तीचा भंग होऊ शकतो. -आर्यन कोळी, माझगाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -