घरमुंबईसोन्याच्या व्यापार्‍यावर हल्ला दागिने लुटले

सोन्याच्या व्यापार्‍यावर हल्ला दागिने लुटले

Subscribe

सोन्याच्या व्यापार्‍यावर हल्ला करून सुमारे 56 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून पळून गेलेल्या तीन गुन्हेगारांना काळाचौकी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अयुब अलीमुद्दीन शेख ऊर्फ अयुब चिकना, मोहम्मद शाहताज जमाल खान आणि मारुती नवनाथ सोनावणे अशी या तिघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत पाच जणांपैकी दोन जण वॉन्टेड होते. त्यात मेहरबान, जमीर व इतर तिघांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या तिघांनाही येथील लोकल कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार अशोक मोहनलाल साकरिया हे व्यवसायाने सोन्याचे व्यापारी असून ते सध्या चिंचपोकळी येथे कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.

6 एप्रिलला रात्री पावणे दहा वाजता ते चिंचपोकळी रेल्वे स्थानकावरुन घराच्या दिशेने जात होते. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शेडजवळून जात असताना चार ते पाच जणांच्या एका टोळीने त्यांच्या हातावर, खांद्यावर लोखंडी चॉपरने वार केले. त्यानंतर ते सर्वजण त्यांच्याकडील सुमारे 56 लाख रुपयांचे 1800 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन पळून गेले होते. या हल्ल्यात ते जखमी झाले होते. ही माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांची जबानी नोंदविण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर पळून गेलेल्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी रॉबरीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी तीन पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने चिंचपोकळी, आग्रीपाडा, आर्थर रोड नाका, भोईवाडा, वडाळा परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

या फुटेजवरुन पोलिसांना काही संशयिताची ओळख पटली होती. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच अयुब चिकना, मोहम्मद शाहताज आणि मारुती सोनावणे या तिघांना पोलिसांनी अटक केली. या तिघांनी या गुन्ह्यांची कबुली देताना त्यांच्या इतर पाच सहकार्‍यांची नावे सांगितली आहे. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या इतर सहकार्‍यांचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच आरोपींकडून चोरीचे सर्व दागिने हस्तगत करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -