घरमुंबईग्रेड, क्रेडीट पद्धत विद्यार्थ्यांच्या मुळावर

ग्रेड, क्रेडीट पद्धत विद्यार्थ्यांच्या मुळावर

Subscribe

लॉ, बी.एड सारख्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया रखडल्या

विद्यापीठाने सुरू केलेल्या ग्रेड व क्रेडीट पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात येणार्‍या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भरताना गुण नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रेड व क्रेडीट पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा अर्ज पूर्ण होत नसल्याने त्यांच्यावर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे.

सीईटी सेलकडून सध्या लॉ तीन वर्षे व पाच वर्षे, बी.पी.एड, एम.पी.एड, बी.एड-एम.एड, बीएबी.एड, बीएस्सी बी.एड, बीए एम.एड, बीएस्सी एम.एड आणि बी.एड यासारख्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. परंतु मुंबई विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेच्या गुणपत्रिकेत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण न देता ग्रेड व क्रेडिट देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक सेमिस्टरला किती गुण मिळाले हे कळत नाही. प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांना किती गुणांपैकी किती गुण मिळाले हेच माहिती नसल्याने त्यांना अर्जात गुण व परीक्षेत मिळालेली टक्केेवारी भरता येत नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने सुरू केलेली ग्रेड व क्रेडीट पद्धती ही विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या मुळावर येत आहे. ग्रेड व क्रेडीट पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येण्याबरोबरच मुंबई विद्यापीठाने काही विद्याशाखांचे निकाल वेळेवर लावले नसल्याने गुणपत्रिकेअभावी विद्यार्थ्यांसमोर अर्ज कसा भरायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर न झाल्याने यावर्षी सीईटी सेलने प्रवेश प्रक्रिया लांबवली होती. परंतु सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रियेबाबत विचारणा होऊ लागल्याने अखेर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. परंतु निकाल जाहीर न होणे व गुणपत्रिका न मिळणे व ग्रेड व क्रेडीट पद्धत यामुळे विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.

सीईटी सेलकडून तातडीची बैठक
ग्रेड व क्रेडीट पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना येणारी समस्या लक्षात घेऊन सीईटी सेलकडून मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनासोबत 1 ऑगस्टला तातडीची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांना विषयनिहाय, सेमिस्टरनिहाय गुण, टक्केवारी नमूद केलेले ट्रान्सस्क्रिप्ट सर्टिफिकेट देता येईल का? तसेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान ई-स्क्रुटनी कशी करता येईल यावर चर्चा होणार आहे. यामध्ये योग्य तोडगा निघाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -