घरमुंबईयूपीत जाऊन कलाकारांना डाकू बनायचंय का? - गुलाबराव पाटील

यूपीत जाऊन कलाकारांना डाकू बनायचंय का? – गुलाबराव पाटील

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दुपारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये १ हजार एकरवर फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली. सोबतच बॉलिवुडमधल्या कलाकारांना उत्तर प्रदेशला येण्याचं आवाहन देखील केलं. मात्र, यावरून आता राजकारण सुरू झालं असून कलाकारांसाठी बॉलिवुड आणि मुंबईच कसं योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीतले अनेक नेते पुढे आले आहेत. याचसंदर्भात बोलताना शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे. ‘उत्तर प्रदेशमध्ये कलाकार कसे जातील? तिकडे जाऊन काय डाकू बनायचंय का?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

गुलाबराव पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी प्रकरणांचा हवाला दिला आहे. ‘बॉलिवुडमधले कलाकार उत्तर प्रदेशमध्ये कशाला जातील. उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्यांना काय डाकू बनायचं आहे का? इथे जे स्वातंत्र्य आहे, माणूस सुरक्षित आहे तो उत्तर प्रदेशात सुरक्षित राहू शकेल का? मुंबई कोणतीही महिला सुरक्षित फिरू शकते. इथे काम करण्याची सुरक्षितता आहे. उत्तर प्रदेशमध्ये कशाला कुणी जाईल? उत्तर प्रदेशमध्ये जेवढ्या लोकांनी बँका लुटल्या आहेत, लुटमार केली आहे त्यांची नुसती नावं जरी बॉलिवुडमधल्या लोकांनी वाचली, तरी तिथे जाण्याचा विचार रद्द करून टाकतील’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, याआधी योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, ‘नोएडामध्ये १ हजार एकरच्या क्षेत्रात फिल्मसिटी उभारली जाईल. विमानतळापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर ही फिल्मसिटी असून बॉलिवुडमधल्या कलाकारांच्या आणि दिग्गजांच्या अनुभवाचा फायदा व्हावा, यासाठी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आम्ही काहीही हिसकावून घेऊन जात नाही आहोत. लोकांना काम करण्यासाठी सुरक्षितता आणि योग्य वातावरण हवं असतं. त्यांना ते जिथे मिळेल, तिथे ते जातील आणि उत्तर प्रदेश यासाठी समर्थ आहे’, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला डिवचलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -