घरमुंबईमुंबईकरांच्या मनात २६ जुलैची आठवण कायम

मुंबईकरांच्या मनात २६ जुलैची आठवण कायम

Subscribe

आभाळ दाटून येत मुसळधार पाऊस पडून आज मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती.

२६ जुलैच्या त्या महाप्रलंयकारी पावसामुळे मुंबईत आलेल्या महापुराच्या आठवणीने मुंबईकर आजही दहशतीखाली आहे. या महापुराला १४ वर्षे शुक्रवारी पूर्ण झाली. परंतु त्याच दिवशी मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाने जोर धरला. दुपारीच अंधार पसरल्याने, मुंबईत पुन्हा मोठा पाऊस येतो की काय? या भीतीने मुंबईकरांच्या पोटात गोळा आला होता. मात्र, संध्याकाळी कामावरून नोकरदार घरी परतण्याच्या वेळेतच पावसाने अधिकच जोर धरला आणि अनेक भागांमध्ये पाणी तुंबून रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी कामावरुन परतणार्‍या प्रवाशांचे तसेच नागरिकांनी भीतीच्या छायेखालीच घरचा रस्ता गाठण्याचा प्रयत्न केला. पावसाच्या या एका तासाच्या रौद्ररुपामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा २६ जुलैची आठवण प्रकर्षाने झाली.

एका तासाच्या पावसात मुंबईकरांची भंबेरी उडाली

मुंबईत सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत शहरात ३८ मि.मी, पूर्व उपनगरात ८८.३६मि.मी आणि पश्चिम उपनगरांत ६५.९६ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. परंतु त्यातील सायंकाळी ७ ते ८ या एका तासात मुसळधार पावसाने सर्वांचीच भंबेरी उडवली. कार्यालयातून घरी जाणार्‍या नागरिकांची यामुळे चांगलीच गैरसोय झाली होती. एका तासातच शहर भागातील वडाळा परिसरात ३७ मि.मी, परळमध्ये ३६ मि.मी, वरळीमध्ये २३ मि.मी, पूर्व उपनगरातील विक्रोळीत ४४ मि.मी, चेंबूर, कुर्ला भागात ३८ मि.मी आणि गोवंडी परिसरात ३६ मि.मी, घाटकोपरमध्ये ३१ मि.मी, भांडुपमध्ये २४ मि.मी तर पश्चिम उपनगरातील मरोळमध्ये ४० मि.मी, विलेपार्ले परिसरात ३९ मि.मी, अंधेरी पश्चिम भागात ३७ मि.मी, वांद्रे परिसरात ३३ मिमी. वांद्रे -कुर्ला संकुल परिसरात २५ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. एका तासात मुसळधार बरसात करत पावसाने मुंबईकरांना २६ जुलैच्या आठवणींना उजाळा दिला.

- Advertisement -

हेही वाचा – खूशखबर! एकाच दिवसात पाण्याची पातळी ७ मीटरने वाढली

महापूराच्या आठवणी दाटून आल्या

त्यामुळे हिंदमाता, गोरेगाव मोतीलाल नगर, अंधेरी विरा देसाई, वांद्रे एस.व्ही.रोड, शीव परिसर, किंग सर्कल गांधी मार्केट, घाटकोपर आदी भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडले होते. या मुसळधार पावसाची संततधार संध्याकाळी कायम राहिल्याने आधीच वाहतूक कोंडी होत असलेल्या पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गासह एस.व्ही. रोड, एलबीएस रोड, यासह सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका मुंबईकरांना बसला होता. मुसळधार पाऊस आणि साचलेले पाणी यामुळे वाहने अत्यंत संथगतीने पुढे सरकत होत्या. मुंबईत महापूर आलेली घटना २६ जुलै रोजीच घडल्याने त्याच दिवशी पावसाचा हे रौद्ररुप पाहून मुंबईकरांच्या मनात पुन्हा एकदा २६ जुलैच्या त्या महापुराच्या आठवणी ताज्या होवून मन दाटून आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -