घरमुंबईनेव्ही नगरला गराडा घातलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन

नेव्ही नगरला गराडा घातलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन

Subscribe

कुलाब्यातील नौदलाच्या कामकाजात डोकावणार्‍या गीतानगर येथील झोपड्यांना लवकरच हटवण्यात येणार आहे. नौदलाच्या अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टीनेच आता या झोपडीवासीयांचे पुनर्वसन नौदलाकडून करण्यात येणार आहे. नौदलाने राज्य सरकारकडे या अतिशय संवेदनशील आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावर झोपडीवासीयांच्या उंचीचा विषय राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यामुळेच या झोपड्यांचे आता बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

दोन ते तीन मजल्यांच्या झोपड्यांमुळे नौदलाच्या अंतर्गत सुरक्षितेवर आणि गोपनीय कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळेच राज्य सरकारने तातडीने या झोपड्यांचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी नौदलाकडून करण्यात आली होती. नौदलाने राज्य सरकारकडे हा विषय मांडल्यानंतर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेत एक समितीची नेमणूक करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्हाधिकारी मुंबई, नौदलाचे अधिकारी आणि मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ यांसारख्या विभागांचा समावेश होता. मुंबईत एसआरएमार्फत मार्चमध्येच बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे झालेले काम पाहता आता गीता नगरच्या झोपड्यांचे कामदेखील अंतिम टप्प्यात आहे. गीतानगरमध्ये १४२१ झोपड्या आहेत. त्यापैकी १२९५ झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

उभ्या स्वरूपात वाढलेल्या झोपड्यांमुळेच गीतानगर, सुंदर नगर आणि आझाद नगर या तिन्ही झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार आहे. सुंदर नगर आणि आझाद नगर येथील येथील झोपड्यांना क्रमांक देण्याचे काम एसआरएकडून पूर्ण झाले आहे. पण दोन्ही ठिकाणच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या विषयाबाबत चर्चा करावी अशी मागणी केली आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचे नेमके कारण काय असा सवाल सुंदर नगर आणि आझाद नगर येथील रहिवाशांनी केला आहे. आझाद नगर येथील ३०० झोपड्यांचे तर सुंदर नगर येथील ४६९ झोपड्यांना क्रमांक टाकण्याचे काम एसआरएकडून पूर्ण करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम काही वेळेसाठी थांबवण्यात आले होते. पण आता या कामाला पुन्हा सुरूवात होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पुनर्वसन हे नौदलाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी खर्चदेखील नौदलाकडून करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे केवळ राज्य सरकारच्या आदेशानुसार काम करत आहे. लवकरच याठिकाणी स्थानिकांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -