घरCORONA UPDATECoronaVirus: छोट्या दवाखाना, नर्सिंग होममध्ये सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार?

CoronaVirus: छोट्या दवाखाना, नर्सिंग होममध्ये सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार?

Subscribe

सर्व दवाखाने आणि नर्सिंग होम उघडण्याचा अट्टाहास कशासाठी? असा ठाण्यातील डॉक्टरांनी सवाल केला आहे. गर्दीमुळे संसर्ग झाल्यास जबाबदारी कोण घेणार?, असं देखील ते म्हणाले आहेत.

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचा आदेश दिला जातो. मात्र, अवघ्या १०-१५ फूटांची डिस्पेन्सरी वा नर्सिंग होम, छोट्या रुग्णालयात सोशल डिस्टन्सिंग कसे ठेवणार?, असा प्रश्न ठाण्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना पडला आहे. आम्ही फॅमिली डॉक्टर म्हणून `व्हॉट्सअॅप’द्वारे औषधे लिहून देत मोफत सेवा देत असताना, सर्व दवाखाने आणि नर्सिंग होम उघडण्याचा अट्टाहास कशासाठी? या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे संसर्ग झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल डॉक्टरांकडून केला जात आहे.

या परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याला जबाबदार कोण?

साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १९८७ अन्वये ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी नोंदणीकृत रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिकांच्या आस्थापना बंद राहिल्यास परवाना बंद करण्याबरोबरच फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. या आदेशाने ठाणे शहरातील नर्सिंग होम चालक डॉक्टर आणि जनरल प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांमध्ये अस्वस्थता आहे. बहुसंख्य डॉक्टरांचे दवाखाने दुकानांच्या गाळ्यात सुरू आहेत. तर १ हजार फुटांपेक्षा कमी जागेत नर्सिंग होम सुरू आहेत. बहुसंख्य डिस्पेन्सरी १० ते १२ फूट लांब जागेत आहेत. या जागेतच तपासणी कक्ष, रुग्णांसाठी आसन व्यवस्था आहे. आता भारतात `कोरोना’चा तिसरा टप्पा सुरू होत असून, अशा परिस्थितीत एखादा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याला जबाबदार कोण?, असा डॉक्टरांचा सवाल आहे. ठाण्यातील अनेक मोठ्या रुग्णालयातील ओपीडीची जागा कमी आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे.

- Advertisement -

सहा फूट अंतर ठेवत सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार?

छोट्या वैद्यकीय व्यावसायिकांकडे जाणारे बहुतांशी रुग्ण हे फॅमिली पेशंट वर्गातील आहेत. या पेशंटना डॉक्टरांचा मोबाईल क्रमांकही माहिती आहे. त्यांना डॉक्टरांकडून `व्हॉट्सअॅप’वर मोफत मार्गदर्शन केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत मोठी जागा असलेल्या रुग्णालयात दाखल केले जाते. त्यानंतर त्यांची तेथे तपासणी केली जाते. मात्र, सर्व दवाखाने उघडल्यास पेशंटची गर्दी होईल. अनेक रुग्ण बीपी किंवा मशीनने शुगर तपासणीसाठीही येतील. अशा परिस्थितीत छोट्या दवाखान्यात आणि नर्सिंग होममध्ये सहा फूट अंतर ठेवत सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार?, असा प्रश्न डॉक्टरांचा आहे. छोटी रुग्णालये आणि ओपीडीमधील नर्स, मदतनीसांसह अनेक कर्मचारी लॉकडाऊनमुळे घरी आहेत. त्यामुळे रुग्णालये उघडण्याची सक्ती अन्यायकारक आहे. अनेक डॉक्टरांकडे मास्क आणि सॅनिटायझर्सही उपलब्ध नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संसर्ग होण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त

कोरोनाच्या दहापैकी नऊ रुग्णांना सुरुवातीला लक्षणे जाणवत नाहीत. असा एखादा रुग्ण नर्सिंग होम आणि दवाखान्यात आढळल्यास संपूर्ण वॉर्डमधील रुग्ण आणि नातेवाईकांना संसर्ग होण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: राज्यात कोरोनाचा आठवा बळी, बुलढाण्यात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -