घरमुंबईआय. ए. कुंदन यांच्या जागी आता डॉ. अश्विनी जोशी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त

आय. ए. कुंदन यांच्या जागी आता डॉ. अश्विनी जोशी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त

Subscribe

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांची सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. कुंदन यांच्या जागी डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. अश्विनी जोशी नियुक्ती करण्यात आली. कुंदन यांना महापालिकेचा अर्थसंकल्प बनवल्यानंतरही प्रकल्प विभागाची जबाबदारी न दिल्यामुळे नाराज होत्या. त्यामुळे त्यांचा महापालिकेच्या कामात रस उरला नव्हता. मागील दोन ते तीन महिन्यांपासून त्यांनी कोणत्याही महत्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केल्या नव्हत्या. त्यामुळे कुंदन यांच्या कार्यालयात फाईल्सचा ढिग पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी आय.ए. कुंदन यांची नियुक्ती मे २०१६मध्ये झाली. तेव्हापासून महापालिकेच्या आरोग्य विभाग, आपत्कालिन व्यवस्थापन विभाग, मुंबई अग्निशमन दल, तसेच कर्मचार्‍यांची बढती आणि पश्चिम उपनगरे आदी महत्वाच्या विभागांची जबाबदारी आहे. संजय शेठी यांची बदली झाल्यानंतर अर्धवट राहिलेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. परंतु अर्थसंकल्प मांडल्यानंतर कुंदन यांना प्रकल्प विभागाची जबाबदारी काढून नव्याने नियुक्ती झालेल्या अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्याकडे सोपवण्यात आली.

- Advertisement -

कुंदन या दराडे यांच्यापेक्षा ज्येष्ठ असतानाही आयुक्तांनी त्यांच्याकडे प्रकल्प कामांची जबाबदारी सोपवल्यामुळे कुंदन काही प्रमाणात नाराज होत्या. तेव्हापासूनच त्यांचा कामात रस नव्हता. नाराज झालेल्या या कुंदन यांनी यामुळेच बदलीसाठी प्रयत्न केला होता. त्यामुळे कोणत्याही खात्याकडून तसेच विभागांकडून स्वाक्षरीकरता आलेल्या फाईल्सची दखल त्या घेत नव्हत्या. परिणामी कुंदन यांच्या दालनात फाईल्सचा ढिग जमा झालेला पहायला मिळत आहे. कुंदन यांनी आपल्या कारकिर्दीत सर्व विभागांचे काम उत्तमरीत्या पार पाडले. परंतु आपल्यापेक्षा कमी अनुभवी दराडे यांच्यामुळे आपल्यावर होत असलेल्या अन्यायामुळेच त्यांनी महापालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे समजते.

राज्य उत्पादन शुल्क खात्यात आयुक्तपदी असलेल्या डॉ. अश्विनी जोशी यांची बदली मागील महिन्यात अडगळीच्या अशा मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीत करण्यात आली होती. आता त्याठिकाणाहून त्यांची बदली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. मुंबई उपनगरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी, मुंबई जिल्हाधिकारी अशा महत्वाच्या पदी नियुक्ती होऊनही त्यांनी आपल्या कडक शिस्तीचा बडगा दाखवला होता. राज्य उत्पादन शुल्कातही त्यांनी आयुक्तपदी काम करताना अनेक लाचखोर कर्मचार्‍यांना घरी पाठवले होते. तसेच बनावट दारू प्रकरणी मागील दोन वर्षात राज्याच्या महसूलात कोट्यवधींनी वाढ केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर तुकाराम मुंढे यांच्याप्रमाणे डॉ. जोशी यांनाही साईड पोस्टिंग दिल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -