घरमुंबईविद्यापीठाच्या नॅक मुल्यांकनात प्रथमच आयडॉल

विद्यापीठाच्या नॅक मुल्यांकनात प्रथमच आयडॉल

Subscribe

पाच वर्षांची माहिती जमविण्याची धावपळ सुरू

मुंबई विद्यापीठाला तब्बल अडीच वर्षांपासून नॅक मुल्यांकन नसल्याने प्रशासन नवीन वर्षात मुल्यांकन मिळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहे. यातच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित निर्देशानुसार दूर व मुक्त अध्ययन संस्थेचाही (आयडॉल) विद्यापीठाच्या मुल्यांकनात समावेश करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या मुल्यांकनात आयडॉलचाही समावेश होणार असल्याने येथील अधिकारी पाच वर्षातील कामगिरीची माहिती जमविण्यासाठी धावपळ करत आहेत.

विद्यापीठाला 21 एप्रिल 2012 मध्ये नॅक मुल्यांकन मिळाले होते. ही मुदत 20 एप्रिल 2017 रोजी संपुष्टात आली. मुल्यांकनाची मुदत संपण्यापूर्वीच विद्यापीठाने नवीन नॅक मूल्यांकनासाठी अर्ज करणे अपेक्षित होते. मात्र विद्यापीठाचे तात्कालीन कुलगुरू यांनी याकडे गांभिर्याने पाहिले नाही. गेल्या वर्षी विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळाल्यानंतर त्यांनी नॅकची प्रक्रिया सुरू केली. यासाठी विद्यापीठाने एक समिती तयार केली आहे. तसेच याबाबत आवश्यक असणार्‍या सुविधांची पुर्तताही केली आहे. मूल्यांकन करताना अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचे पाठबळ, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थेतील चांगले उपक्रम या बाबींचा विचार केला जातो. या सर्वासाठी विद्यापीठाकडून चांगला अहवाल नॅककडे जाणे अपेक्षित असते. त्याप्रमाणे विद्यापीठाने अहवाल तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे.

- Advertisement -

यातच विद्यापीठ अनुदान आयोगाने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्याप्रमाणे देशभरातील विद्यापीठाशी संलग्न असणार्‍या दूर व मुक्त अध्ययन संस्थांचाही समावेश संबंधीत विद्यापीठाच्या नॅक मुल्यांकनात करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार दुहेरी मुल्यांकन प्रकारात मुंबई विद्यापीठाने अर्ज करण्याचे ठरवले आहे. आयडॉलचा समावेश विद्यापीठाच्या मुल्यांकनात करण्यात येणार असल्याने कुलगुरू, प्र-कुलगुरू यांनी नुकतीच आयडॉलमधील अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये गेल्या पाच वर्षातील आयडॉलच्या कामगिरीची माहिती जमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे आयडॉलनेही अधिकार्‍यांकडे जबाबदारी सोपवली आहे. विद्यापीठातील विभागांना 900 गुण आणि आयडॉलला 100 गुण अशी विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या पाच वर्षातील कामगिरीनुसार आयडॉल मुल्यांकनात अधिकाधिक गुण मिळवून विद्यापीठाला नॅक मिळविण्यात मदत करणार असल्याचे, एका अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -