घरमुंबईबाप्पांच्या मार्गात महागाईचे विघ्न, इंधनदरवाढीमुळे मूर्तींच्या किंमती वाढणार

बाप्पांच्या मार्गात महागाईचे विघ्न, इंधनदरवाढीमुळे मूर्तींच्या किंमती वाढणार

Subscribe

पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती, गणपती मूर्तीसाठी लागणाऱ्या मातीच्या वाढलेल्या किंमती, रंग, कुशल कलाकार, मदतनीसांचे वाढणारे मानधन यामुळे यंदा बाप्पांच्या मूर्तींच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ बसणार आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती, गणपती मूर्तीसाठी लागणाऱ्या मातीच्या वाढलेल्या किंमती, रंग, कुशल कलाकार, मदतनीसांचे वाढणारे मानधन यामुळे यंदा बाप्पांच्या मूर्तींच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. उरण मधील जोहे गावातील अजित आर्ट्स मूर्तीशाळेचे मालक अजित म्हात्रे यांनी याबाबत माहिती दिली. सरकारने सुरू केलेल्या प्लास्टिक व थर्माकोलच्या बंदीमुळे मखर सजावटही महागणार असल्याने या वर्षीचा गणेशोत्सव सामान्यांसाठी महागडाच ठरण्याची चिन्हे आहेत. विशेष थर्माकोलवरही बंदी आणल्याने मागील दिडदोन महिन्यांपासून थर्माकोल मखराचे काम करणाऱ्यांचे नुकसान होणार आहे. गणपतींच्या मखरासाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. त्यातच कागद आणि पुठ्ठे किंवा कापडाचे मखर साकारणे महागडे ठरत असल्याची माहिती आहे. इंधनदरवाढ, थर्माकोलबंदी यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा गणेशोत्सव सर्वसामान्यांना महागडा ठरणार आहे.

ganpati idol
गणेश मूर्ती

 ३० ते ४० टक्के किंमती वाढण्याची शक्यता

जी गणपतीची मूर्ती पाच हजार रुपयांना उपलब्ध केली जात होती. इंधनदरवाढीमुळे त्याची यावर्षीची किंमत एक ते दीड हजाराने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी ज्या गणपतीसाठी लागणारी मातीचे एक पोते अवघ्या शंभर ते सव्वाशे रुपयांना मिळत होते. तेच यावर्षी सुमारे पावणे दोनशे रुपयांपर्यंत पोहोचले असल्याने किंमती किमान ३० ते ४० टक्के वाढवाव्याच लागतील, अशी माहिती खोपटे गावातील त्रिमूर्ती कला केंद्राचे मूर्तीकार भालचंद्र म्हात्रे यांनी दिली. गणेशोत्सवाला आता अवघे ८० दिवस राहिले असल्याने मूर्ती घडविण्याचे काम काही दिवसात थांबवून रंगरंगोटीची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.

- Advertisement -
ganesh idol
मूर्तीकार मूर्ती बनवताना

मूर्ती कारखानदारांनाही सरकारी अनुदानाची गरज

सरकार अनेकांना अनुदान देत असतांना थेट जनतेशी संबंध येणाऱ्या गणपती मूर्ती कारखानदारांनाही काही अनुदान देण्याची गरज भालचंद्र म्हात्रे यांनी बोलून दाखवली. मुंबई सारख्या ठिकाणी तात्पुरते कारखाने उभारणी करण्यासाठी जागा उपलब्ध केली जाते. मात्र आमच्यासारख्या ग्रामीण भागात ही कला जोपासणाऱ्या मूर्तीकारांना आपल्या घरीच हा व्यवसाय जोपासावा लागत आहे. त्यामुळे जागेची अडचण ही मोठी असते, अशी खंत भालचंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -